Headlines

पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे:राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे 127व्या दीक्षान्त समारंभात आवाहन




राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनण्याचे आवाहन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे जग वेगाने बदलत आहे, असे ते म्हणाले. शिक्षण, संशोधन, नवीन कल्पना आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विद्यापीठाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यपाल वर्मा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२७ व्या दीक्षान्त समारंभात बोलत होते. यावेळी कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर आणि कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते. व्यवस्थापन परिषदेचे सदस्यही हजर होते. राज्यपाल म्हणाले की, दीक्षान्त समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे. या टप्प्यावर ज्ञानाचे रूपांतर जबाबदारीत आणि शिक्षणाचे नेतृत्वात होते. बदलत्या काळात केवळ पदवी पुरेशी नाही. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर ज्ञान मिळवत राहावे आणि नवीन कौशल्ये शिकावीत. शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्याचे साधन नाही, तर समानता, सक्षमीकरण आणि सामाजिक बदलाचे प्रभावी माध्यम आहे. सावित्रीबाई फुले यांचा हा विचार विद्यार्थ्यांनी पुढे न्यावा, असे आवाहन त्यांनी केले. वर्मा यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० लागू करण्यासाठी विद्यापीठाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. बहुविषयक शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन, नवीन कल्पना, भारतीय ज्ञानपरंपरा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याला प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले. परवडणारे आणि चांगले शिक्षण देण्यावरही भर द्यावा. डिजिटल प्रशासन आणि हरित उपक्रमांमुळे विद्यापीठ अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि शाश्वत होईल, असेही राज्यपाल वर्मा यांनी सांगितले. दुबई, सौदी अरेबिया आणि कझाकिस्तानमधील शैक्षणिक भागीदारीमुळे विद्यापीठाचा जागतिक विस्तार मजबूत होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी देवाणघेवाण, संयुक्त संशोधन, आंतरराष्ट्रीय प्राध्यापक आणि जागतिक भागीदारीलाही महत्त्व द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठांनी उद्योग क्षेत्रासोबत भागीदारी वाढवावी. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, इंटर्नशिप, शिकाऊ उमेदवारी, संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. माजी विद्यार्थ्यांचे जाळेही अधिक मजबूत करावे. त्यांचा उपयोग मार्गदर्शन, शिष्यवृत्ती, नोकरी, संशोधन आणि नवीन कल्पनांसाठी करून घ्यावा, असे वर्मा म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, आरोग्य, शेती, सायबर सुरक्षा, शाश्वत विकास, ग्रामीण बदल आणि नवीन तंत्रज्ञान या क्षेत्रांतील संशोधनाला चालना देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक विद्यापीठाने वार्षिक क्रीडा दिनदर्शिका तयार करावी. प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एका खेळात किंवा शारीरिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. खेळ विद्यार्थ्यांना शिस्त, संघभावना आणि नेतृत्व शिकवतात, असे राज्यपालांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *