Headlines

'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मार्ग निघणार नाही':अवास्तव मागण्या कशा पूर्ण होणार? मंत्री गिरीश महाजनांचा जरांगेंना सवाल




मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच, अंतरवाली सराटी येथे गेल्या 14 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जाहीर शिव्या देऊन या प्रश्नावर कोणताही मार्ग निघणार नाही, त्यामुळे आंदोलकांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच चर्चा करून तोडगा काढावा, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. गिरीश महाजन म्हणाले, आम्ही वारंवार त्यांची भेट घेतली आहे. त्यांच्या 14 पैकी 12 मागण्या सरकारने सनदशीर मार्गाने मान्य केल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण, शैक्षणिक सवलती, ओबीसींप्रमाणे सर्व लाभ सरकारने दिले आहेत. पण कोर्टाच्या आदेशाबाहेर जाऊन ‘सगेसोयरे’ किंवा ‘जात पडताळणी समितीच रद्द करा’ अशा अवास्तव मागण्या कशा पूर्ण होणार? असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना जाहीर शिव्या देऊन मार्ग निघणार नाही. आंदोलकांनी कायद्याच्या चौकटीत राहून चर्चा करावी असे महाजन म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, संजय राऊतांना प्रत्येकाचा मर्डर करण्याचा कट दिसतोय. स्वतःला मारण्याचा कटही त्यांनी आधी बोलून दाखवला होता. ते अजून जीवंत आहेत न? काहीतरी प्रसिद्धीसाठी बोलायचे, मनात येईल ते बरळायचं, ही त्यांची जुनी सवय आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. पेपरफुटी प्रकरणी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, सरकार कुठेही अपयशी ठरलेले नाही. काही नालायक लोकांनी पैशांच्या हव्यासापोटी हा गैरप्रकार केला आहे. त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पेपर छपाईपासून ते वितरणापर्यंत अनेक लोकांच्या हातातून जातो. केंद्र आणि राज्य सरकारने पेपरफुटीविरोधात अतिशय कडक कायदे केले आहेत. विद्यार्थ्यांचा राग स्वाभाविक आहे. मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांची बैठक घेऊन प्रश्न सोडवले आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी सावध राहावे, काही मंडळी या आंदोलनात स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परीक्षा पारदर्शक व्हाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *