Headlines

प्रॉपर्टीच्या वादातून बेलतरोडीत गोळीबार:एका युवकाला गंभीर दुखापत, 6 आरोपींना काही तासांत अटक




नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोटाळ पांजरी येथे प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून एका युवकावर गोळीबार करण्यात आला. गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने काही तासांतच ६ आरोपींना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता गोटाळ पांजरी येथील श्री स्वामी समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर ही घटना घडली. फिर्यादी शैलेश हिरामनजी गुल्हाने (४०, रा. मानेवाडा) यांचा मित्र कार्तिक ऊर्फ शुभम धार्मिक याचे आरोपी सुनील बानाईत आणि चंद्रमणी नगराळे यांच्यासोबत प्रॉपर्टीच्या पैशांवरून वाद होता. या वादामुळे सुनील बानाईतने कार्तिकला चर्चेसाठी गोटाळ पांजरी येथे बोलावले होते. कार्तिक आणि शैलेश आपल्या मित्रांसह घटनास्थळी पोहोचले. तिथे आरोपी सुनील बानाईत, चंद्रमणी नगराळे, सुलभ दिवेकर, निलेश टेंभुर्णे, आनंद ठाकूर, सोनू ठाकूर आणि आकाश यादव हे दोन गाड्यांमधून आले. आरोपींनी कार्तिक आणि शैलेश यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आनंद ठाकूरने जवळ असलेल्या बंदुकीतून थेट गोळीबार केला. या गोळीबारात कार्तिक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके सक्रिय झाली. पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची ७ विशेष पथके तयार करण्यात आली. सायबर पथकाचे तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, एआय तंत्रज्ञान आणि शहरात लावलेल्या नाकाबंदीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला. बुटीबोरी आणि इतर परिसरातून सुनील बानाईत, आनंद ठाकूर, चंद्रमणी नगराळे, शुभम दिवेकर, निलेश टेंभुर्णे आणि धर्मेन्द्र ऊर्फ सोनू ठाकूर या ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ब्रेझा आणि डस्टर ही दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. बेलतरोडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *