![]()
चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने रस्ते आणि इतर सुविधांची कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. अनेक रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृतपणे फोडलेले दुभाजक बंद करण्यासह वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी चाकण एमआयडीसी पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. या बैठकीत रस्ते, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग, पाणी निचरा, वीजपुरवठा आणि परिसराच्या सुशोभीकरणाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत चाकण औद्योगिक वसाहतीमधील एकूण ५७.३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा आढावा घेण्यात आला. यात एमआयडीसीचे २५ किलोमीटर, राष्ट्रीय महामार्गाचे १२.८ किलोमीटर, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे २२ किलोमीटर आणि पीएमआरडीएचे १७.५ किलोमीटर रस्ते आहेत. या सर्व यंत्रणांनी एकत्र काम करून वेळेत कामे पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या. टप्पा दोनमधील ७५ मीटर रुंदीच्या मुख्य रस्त्याचे ५.५० किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. टप्पा चारमधील ४.०३ किलोमीटर लांबीच्या सहापदरी रस्त्याचे काँक्रीटीकरण, पदपथ दुरुस्ती, दुभाजक आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. हे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. टप्पा एक व दोनमधील १४.६५ किलोमीटर, टप्पा तीनमधील आळंदी फाटा ते व्होक्सवॅगन-स्कोडा कंपनीपर्यंतचा ५.७० किलोमीटर आणि टप्पा पाचमधील ४.४० किलोमीटर रस्त्यांची कामेही वेगाने सुरू आहेत. वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी ४५ एमएसएफ जवानांच्या नियुक्तीला मंजुरी मिळाली आहे. तसेच वाहतूक पोलिसांना एमआयडीसीकडून एक क्रेन आणि ५० जॅमर देण्याची प्रक्रिया सुरू आहे. महामार्गावरील अनधिकृतपणे फोडलेले दुभाजक बंद केले जात आहेत. औद्योगिक वसाहतीमधील पार्किंग सुरू करण्यात आले आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी निचरा व्यवस्था उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले. महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरसाठीचे बांधकामही सुरू असून, सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुभाजकांच्या देखभालीसाठी नियमित तपासणीचा आराखडा आणि औद्योगिक क्षेत्राच्या सुशोभीकरणाचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या बैठकीला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, आमदार शंकर मांडेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Source link
चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची कामे वेगात:वाहतूक कोंडीवर उपाययोजना सुरू; राष्ट्रीय महामार्गावरील फोडलेले दुभाजक बंद करणार