![]()
पुणे शहरात दररोज 100 किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या संस्था, हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि गृहनिर्माण सोसायट्यांसाठी स्वतःच्या परिसरातच कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने आता कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सुमारे 1,942 बल्क वेस्ट जनरेटर आहेत. नियमांनुसार या आस्थापनांनी स्वतःच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. दररोज सुमारे 20 टनांहून अधिक कचऱ्यावर प्रक्रिया होणे आवश्यक असताना प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कचरा प्रकल्प बंद असल्याचे आढळून आले आहे. परिणामी हा कचरा महापालिकेच्या यंत्रणेकडे किंवा इतरत्र टाकला जात आहे. अलीकडेच आरोग्य विभागाने विविध सोसायट्या आणि आस्थापनांची तपासणी केली असता 600 पेक्षा अधिक कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद असल्याचे उघड झाले. ही बाब गंभीर मानत प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. घनकचरा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रजीत नायर यांनी संबंधित सर्व सोसायट्या आणि संस्थांमधील कचरा प्रकल्प कार्यरत आहेत की नाहीत याची सखोल पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात लवकरच व्यापक कारवाई मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या या भूमिकेमुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाला शिस्त लागणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Source link
पुणे शहरात 600 हून अधिक कचरा प्रकल्प बंद:नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाची लवकरच व्यापक कारवाई