![]()
पुणे शहराच्या शाश्वत नागरी विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि पूरनियंत्रण या दोन मोठ्या प्रकल्पांना एकूण 1,290 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. गृहविकास व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अपेक्स कमिटीच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या मंजूर निधीपैकी, पुणे शहरालगतच्या 12 गावांसाठी 890 कोटी रुपयांचा पाणीपुरवठा प्रकल्प राबवला जाईल. यात खडकवासला, नांदेड, नांदोशी, सनसनगर, किरकीटवाडी, धायरी, नºहे, जांभूळवाडी, कोल्हेवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी आणि भिलारवाडी या गावांचा समावेश आहे. या योजनेद्वारे 200 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प, 71 किमी लांबीची ट्रान्समिशन लाईन आणि 390 किमी वितरण व्यवस्था उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात स्काडा आणि एएमआर आधारित स्मार्ट मीटरिंग प्रणालीचा वापर करून 2052 पर्यंत सुमारे 7.78 लाख नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. उर्वरित 400 कोटी रुपये पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणासाठी वापरले जातील. या अंतर्गत शहरातील 335 पूरग्रस्त ठिकाणी पावसाळी जलनिस्सारणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. या उपाययोजनांमुळे नागरिकांची सुरक्षितता वाढण्यासोबतच सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीतील समान पाणीपुरवठा योजनेचे 85 टक्के काम पूर्ण झाले असून, हा प्रकल्प ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. सध्या सात गावांमध्ये काम सुरू असून, 25 गावांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे स्मार्ट जलव्यवस्थापनावर भर दिला जाईल, ज्यामुळे पाणी गळती कमी होऊन अधिक कार्यक्षम प्रणाली विकसित होईल. पुणे शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम, आधुनिक आणि शाश्वत करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहराच्या विकासाला विशेष गती मिळत आहे. या बैठकीत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले, तर अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्या पाठिंब्यामुळे हा महत्त्वपूर्ण प्रकल्प मंजूर होऊ शकला.
Source link
पुण्याच्या विकासाला 'बळ:12 गावांचा पाणीप्रश्न सुटणार अन् पुरावरही मिळणार नियंत्रण! 1290 कोटींच्या निधीला मंजुरी