![]()
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या (एकेएफआय) अध्यक्षपदी युवा उद्योजक पुनीत बालन यांची बिनविरोध निवड झाली आहे. २०२६ ते २०३० या कालावधीसाठीच्या या नव्या कार्यकारिणीत देशभरातील विविध राज्यांतील प्रतिनिधींना संधी देण्यात आली असून, एकूण २२ पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणूक रांची (झारखंड) येथे पार पडली. या निवडणुकीसाठी महासंघाचे २२ राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्राचे क्रीडा प्रशासक आणि उद्योगपती पुनीत बालन यांची अध्यक्षपदी निवड झाली. तसेच, विदर्भातील माजी खासदार रामदास तडास यांची अध्यक्ष (प्रेसिडेंट एमेरिटस) म्हणून, तर बिहारचे राजकुमार सिंह यांची मुख्य संरक्षक (चीफ पॅट्रन) म्हणून निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी तेलंगणाच्या उशी रेड्डी यांची निवड झाली असून, इतर महत्त्वाच्या पदांवर व कार्यकारिणीत देशातील विविध राज्यांतील प्रतिनिधींची बिनविरोध निवड करण्यात आली. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रत्नाकर भेंगरा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले, तर दिवाणी न्यायालयाचे सहायक निवडणूक अधिकारी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंकज श्रीवास्तव यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. नवनिर्वाचित अध्यक्ष पुनीत बालन हे विविध क्रीडा उपक्रमांना सातत्याने पाठबळ देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कबड्डीला नवी दिशा आणि गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या निवडीनंतर पुनीत बालन यांनी देशभरातील सर्व राज्य संघटना आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले, “कबड्डी हा भारताचा पारंपरिक आणि जनमानसाशी जोडलेला खेळ आहे. या खेळाला जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी, ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी, आधुनिक प्रशिक्षण सुविधा उभारण्यासाठी आणि महिला तसेच युवा कबड्डीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” बालन यांनी पुढे सांगितले की, “सर्व पदाधिकाऱ्यांना आणि राज्य संघटनांना सोबत घेऊन भारतीय कबड्डीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असून, देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.”
Source link
पुनीत बालन यांची भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्षपदी निवड:2026-30 कार्यकारिणीत 22 पदाधिकाऱ्यांचा समावेश