Headlines

पुन्हा पेपर फुटणार नाही, याची हमी कोण देणार?:विद्यार्थ्यांचा उद्विग्न सवाल; कमी मार्क आल्याने विद्यार्थिनीच्या वडिलांना हार्ट अटॅक




‘नीट’ पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची धग आता राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्येही आज विद्यार्थी आणि पालकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आक्रोश व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर, अहिल्यानगरमध्ये दुसऱ्यांदा नीटची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपला संताप व्यक्त करत, “पुन्हा 2027 मध्ये नीटचा पेपर फुटणार नाही, याची गॅरंटी आम्हाला कोण देणार?” असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच अहिल्यानगर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अहिल्यानगरमधील हर्षाली यादव हिची कहाणी ‘नीट’ पेपरफुटीचा सामान्य कुटुंबांवर किती भयानक परिणाम होतो, याचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मजुरी करणाऱ्या तिच्या वडिलांनी अतोनात कष्ट करून तिच्या कोचिंगचा खर्च पेलला होता. मात्र पेपरफुटीमुळे तिला पुन्हा परीक्षा द्यावी लागली. या दुसऱ्या प्रयत्नातही अपेक्षित गुण न मिळाल्याच्या धक्क्याने तिच्या वडिलांना थेट हृदयविकाराचा झटका आला. अशा कठीण परिस्थितीत आता हर्षालीला पुन्हा नव्याने परीक्षेची तयारी करायची असली तरी, कोचिंगसाठी पैसे कुठून आणायचे, हे मोठे आर्थिक संकट तिच्यासमोर आ वासून उभे राहिले आहे. भविष्यात पेपर फुटणार नाही याची हमी कोण देणार? अहिल्यानगरमधीलच निर्मिती साळवे या विद्यार्थिनीची अवस्थाही अशीच निराशाजनक आहे. तिने पहिल्या प्रयत्नात ‘नीट’ परीक्षेत 500 हून अधिक गुण मिळवले होते. मात्र पेपरफुटीमुळे पुन्हा द्याव्या लागलेल्या परीक्षेत तिला केवळ 200 गुणांवर समाधान मानावे लागले. या अन्यायामुळे हताश झालेल्या निर्मितीने, “भविष्यात पुन्हा परीक्षा दिल्यास पेपर फुटणार नाही याची हमी कोण देणार?” असा उद्विग्न सवाल उपस्थित केला आहे. वारंवार परीक्षा द्याव्या लागल्याने विद्यार्थी आणि पालकांची मोठी मानसिक व आर्थिक कोंडी होत असून, सरकारने या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने कठोर कायदा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. नीट ऐवजी स्वतंत्र परीक्षा घेण्यात यावी- तज्ञ दरम्यान, या वाढत्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञ शिक्षकांनी एका महत्त्वपूर्ण बदलाची मागणी केली आहे. संपूर्ण देशात एकच ‘नीट’ परीक्षा घेण्याऐवजी ती प्रत्येक राज्यात स्वतंत्रपणे आयोजित करण्यात यावी, असा पर्याय त्यांनी सुचवला आहे. असे केल्यास पेपरफुटीच्या अशा दुर्दैवी घटनांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येईल आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येऊन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास या शिक्षकांनी व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *