Headlines

पुलाच्या कामामुळे माळीवाडा-जैतापूर रस्ता चिखलमय:पर्यटक, नागरिक त्रस्त, पाण्याची डबकी अन् खड्ड्यांमुळे चिवटीबारी मार्गावरील प्रवास धोकादायक‎‎




बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दुर्गम आदिवासी भागाला जोडणाऱ्या माळीवाडा-जैतापूर रस्त्याची पावसामुळे दैना झाली आहे. जैतापूरजवळील नाल्यावर सुरू असलेल्या पुलाच्या कामासाठी केलेल्या मातीच्या भरावावर पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे व पाण्याची डबकी निर्माण झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. पुलाच्या बांधकामामुळे रस्त्यावर आलेल्या मातीमुळे चिखलाचे थर निर्माण झाले आहेत. पावसाचे पाणी साचल्याने रस्ता निसरडा झाला असून, दुचाकीस्वारांची मोठी कसरत होत आहे. वाहन घसरण्याची शक्यता असल्याने गंभीर अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. चिवटीबारी हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यात खुलणारे सौंदर्य पाहण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यामुळे माळीवाडा-जैतापूरमार्गे चिवटीबारीकडे जाणारा रस्ता स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठीही महत्त्वाचा आहे. रस्त्याची दुरवस्था कायम राहिल्यास पर्यटनाच्या दृष्टीनेही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. चिवटीबारीकडे येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ लक्षात घेता संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या मार्गाकडे महत्त्वाचा पर्यटन मार्ग म्हणून पाहण्याची गरज आहे. रस्त्याची तातडीने पाहणी करून धोकादायक ठिकाणी उपाययोजना कराव्यात. पुलाचे काम गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून भविष्यात पावसाळ्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, पुलाचे काम सुरू असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. तात्पुरत्या डागडुजीऐवजी कायमच्या उपायांची गरज पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये मुरूम टाकणे किंवा चिखलावर तात्पुरती मलमपट्टी करणे हा कायमस्वरूपी उपाय ठरणार नाही. रस्त्याचे मजबूत बांधकाम, योग्य पाण्याचा निचरा, भक्कम भराव आणि दर्जेदार साहित्याचा वापर करून टिकाऊ रस्ता तयार करण्याची गरज आहे. पुलाचे काम सुरू असताना नागरिकांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था करणेही आवश्यक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *