![]()
आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत अधिकाधिक वापर करावा, या उद्देशाने महान येथे ड्रोनद्वारे पिकांवर फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. येथील कृषी सेवा केंद्र व क्रॉप सायन्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने महान ते पिंजर रस्त्यावरील तुषार गजानन बहादरे यांच्या शेतात हे यशस्वी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी ड्रोनच्या साहाय्याने विविध पिकांवर अचूक व प्रभावी औषध फवारणी करून दाखवण्यात आली. पारंपरिक फवारणी पद्धतीच्या तुलनेत ड्रोन फवारणीमुळे अत्यंत कमी वेळात मोठ्या क्षेत्रावर फवारणी करणे शक्य होते. तसेच यामुळे पाणी आणि औषधांची मोठी बचत होऊन मजुरीचा होणारा मोठा खर्च कमी होण्यास मदत होते, अशी सविस्तर माहिती तज्ज्ञांनी उपस्थितांना दिली. ड्रोनच्या मदतीने पिकांवर सर्वत्र समान प्रमाणात फवारणी होत असल्याने सोयाबीन, हळद, कापूस, मका, भुईमूग यांसारख्या पिकांसह फळबागांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर व उपयुक्त ठरत असल्याचे सांगण्यात आले. परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रवीण गाडवे, कंपनीचे अधिकारी बी. जे.भाजीपाले, शिवशंकर अंभोरे, तुषार गावंडे व श्रीकांत जानूनकर यांनी पुढाकार घेतला. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शेतकरी गणेश नानोटे, अमोल भांगे, डॉ. वसंत जाणूनकर, साजेब पठाण, विलास जाणूनकर, दादाराव जानोरकर, शंकर पोफळे, दिगंबर म्हैसने, दिलीप सरोदे, प्रमोद भडांगे, सरफराज खान, अमोल तायडे, सुनील जानोरकर, निळकंठ नानोटे व शेतकरी उपस्थित होते. ड्रोन फवारणीचे फायदे { वेळ व मजुरीची बचत: पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत अतिशय वेगाने फवारणी पूर्ण होऊन मजुरीचा खर्च वाचतो. { पाणी व औषधांची बचत: अचूक फवारणीमुळे औषध व पाण्याचा अपव्यय टळतो. { समान फवारणी: पिकांच्या सर्व भागांवर औषध योग्य प्रमाणात पोहोचते. यामुळे होणारे नुकसानाही टाळता येते.
Source link
पिकांवर ड्रोनने फवारणी; नव तंत्रज्ञानाकडे कल:वेळ, पाणी व औषधांची होणार बचत; मजुरीचा खर्च कमी होण्यास मिळेल पाठबळ