![]()
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० मुळे उच्च शिक्षण व्यवस्थेत झालेल्या व्यापक बदलांच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमधील शैक्षणिक कार्यभार निश्चिती आणि आवश्यक पदसंख्या निर्धारणाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने पुढाकार घेत तयार केलेले विनियम क्र. ११ व १२/२०२६ हे महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याचे प्रतिपादन श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे होते, तर प्राचार्य डॉ. दीपक धोटे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. दीपक धोटे यांनी एनईपी २०२० अंतर्गत बदललेल्या शैक्षणिक संरचनेमुळे महाविद्यालयांसमोर उभ्या राहिलेल्या कार्यभार निश्चितीच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला. शासनाकडून अद्याप स्पष्ट निर्देश प्राप्त झाले नसल्यामुळे विविध अभ्यासक्रम, बहुविषयक शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम तसेच नवीन शैक्षणिक घटकांचा कार्यभार कसा निश्चित करायचा, याबाबत राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अभ्यासपूर्ण पद्धतीने विनियम तयार करून महाविद्यालयांना मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे विनियम महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील मैलाचा दगड ठरतील, असे सांगताना डॉ. धोटे यांनी या विनियमांच्या निर्मितीमागील ऐतिहासिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय पार्श्वभूमी उपस्थितांसमोर मांडली. कार्यभार निश्चितीची प्रक्रिया केवळ प्रशासकीय बाब नसून शिक्षणाच्या गुणवत्तेशी संबंधित असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे यांनी राज्यातील महाविद्यालयांसमोरील कार्यभार निश्चितीच्या समस्येवर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने प्रभावी आणि व्यवहार्य तोडगा उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन केले. कार्यशाळेला विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अरुण हरणे, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली गुडधे, विद्या विभागाचे उपकुलसचिव डॉ. ऋतुराज देशमुख तसेच महाविद्यालयीन विभागाच्या सहायक कुलसचिव डॉ. साक्षी ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यापीठातील विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागांच्या प्रतिनिधींमुळे कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिनेश खेडकर यांनी केले, तर विद्यापीठ आयक्यूएसीचे संचालक डॉ. संदीप व्ही. वाघुळे यांनी आभार मानले. यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, आयक्यूएसी समन्वयक, एनईपी सेल समन्वयक, कार्यभार नियमन समन्वयक तसेच ज्येष्ठ प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेतील विशेष आकर्षण ठरले ते कार्यभार गणनेच्या प्रात्यक्षिकाचे. कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ. दिनेश खेडकर यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या संगणकीय एक्सेल प्रोग्रामद्वारे कार्यभार निश्चितीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून दिली. विद्यार्थ्यांची प्रवेशित संख्या नोंदविल्यानंतर प्रत्येक विषयाचा कार्यभार स्वयंचलितपणे निश्चित होत असल्याने ही प्रक्रिया अधिक सुलभ, अचूक, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रतिनिधींनी या उपक्रमाचे स्वागत केले.
Source link
विद्यापीठाचा ऐतिहासिक पुढाकार; महाराष्ट्रासाठी ठरणार दिशादर्शक:एनईपी 2020 अंतर्गत कार्यभार नियोजनासाठी एकदिवसीय प्रशिक्षण