![]()
अमरावती जिल्ह्यातील संग्रामपूर आणि राजुरा येथे आलेल्या पुरामध्ये अडकलेल्या १६ जणांना जिल्हा शोध व बचाव पथकाने एकाच रात्री सुरक्षित बाहेर काढले. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पथकाने धाडसी बचावकार्य करत अनेकांचे प्राण वाचवले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर येथे बेंबळा नदीला आलेल्या पुरामुळे ९ जण छतावर अडकले होते. मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी रात्री ११ च्या सुमारास अचानक वाढले आणि गावात शिरले. यामुळे अनेक नागरिक घरातच अडकून पडले होते. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाने तातडीने कार्यवाही केली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार, रात्री १२.१० वाजता बचाव पथक सर्व आवश्यक साहित्यासह घटनास्थळी पोहोचले. अंधारात बोटीच्या साहाय्याने या ९ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या मोहिमेत आरडीसी संतोष काकडे आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल निमकर, कौस्तुभ वैद्य, पी. एस. गायकवाड, गणेश कायदेकर, सुरज ठाकूर, दीपक भोईटे, मनीष उताणे आणि गोकुळ मुंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरी घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील राजुरा येथे घडली. रात्री ८.३५ वाजता मोखड नदीच्या पुरामध्ये ७ जण अडकल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. यात ४ महिला, २ पुरुष आणि एक २ वर्षांचे बाळ होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुसरे आपत्ती व्यवस्थापन पथक रात्री ९.२० वाजता घटनास्थळी दाखल झाले. काळोख्या अंधारात नदीचा तुफान प्रवाह, लाकडी दांडके, झाडेझुडपे आणि विषारी साप यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक होते. गोताखोरांनी रबर बोट पाण्यात उतरवून अडकलेल्या सर्वांना वाचवले. या बचावकार्यात सचिन धरमकर, आकाश निमकर, मुकेश सदांशिव, सचिन पवार, चैतन्य पोहाणे, प्रफुल भुसारी, अजय आसोले, आपदा मित्र तुळशीराम गोडाणे आणि भूषण काळे यांचा सहभाग होता.
Source link
पूरग्रस्त 16 जणांचे वाचले प्राण:जिल्हा बचाव पथकाने एकाच रात्री दोन आव्हानांवर केली मात