Headlines

पूल उभारणीसाठी भोये यांचे बेमुदत उपोषण सुरू:दावलेश्वर हेदपाडा नदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर‎




महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील देवडोंगरा ग्रामपंचायत हद्दीतील दावलेश्वर कामतपाडा हेदपाडा येथील नदीवरील पुलाचे उद्घाटन होऊनही बांधकाम रखडल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ये-जा करण्यासाठी कायमस्वरूपी लोखंडी पूल उभारण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी हरसूल-नाशिक मुख्य रस्त्यावर भर उन्हात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सध्या परिसरात ३९ अंश सेल्सिअस तापमान असतानाही डॉ. भोये उपोषणावर ठाम असून, पावसाळ्यापूर्वी लोखंडी पुलाच्या बांधकामास सुरुवात होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यावेळी हरसूल व परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. हरसूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनीही उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. पूल कोणत्या विभागाच्या अखत्यारित आहे, याची जबाबदारी निश्चित करून संबंधित विभागाने लोखंडी पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करावे. कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार, असे डॉ. भोये यांनी सांगितले. या पुलाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले होते. मात्र, आमरण उपोषणाचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर संबंधित पूल हा जिल्हा परिषद विभागाच्या अखत्यारित असल्याचा लेखी खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. तसेच उपोषणकर्ते व त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव यांना याबाबत लेखी पत्र देण्यात आले. त्यामुळे पुलाच्या बांधकामाची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाकडे आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *