Headlines

पैठण शहरामध्ये अमळनेरकर महाराज यांच्या दिंडीचे स्वागत:संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात कार्यक्रम‎




अमळनेरकर महाराज यांच्या अमळनेर ते पंढरपूर दिंडी सोहळ्याचे आगमन पैठण शहरात होताच पैठण शहरातील भक्त मंडळीकडून त्यांच्या दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. या दिंडी सोहळ्याने १ जुलै रोजी अमळनेर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले होते. हा दिंडी सोहळा २४ जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथील यात्रा उत्सवात सहभागी होण्यासाठी दाखल होतो. पंढरपूर येथे दाखल होणाऱ्या हजारो दिंड्यांपैकी एक अमळनेरकर महाराजांचा दिंडी सोहळा हा दिंडी सोहळा सर्वात जलद गतीने पंढरपूर येथे पोहोचणारा दिंडी सोहळा असल्याची चर्चा पैठण शहरात होताना दिसत होती. हा सोहळा ७५० किलोमीटरचे अंतर २४ दिवसांत पार करण्यात येते. यामध्ये प्रतिदिन किमान ३० किलोमीटर तर जास्तीत जास्त ४५ किलोमीटर अंतर पार केले जाते, अशा जलद गती चालणारा हा दिंडी सोहळ्याचे पैठण शहरात संध्याकाळी आठ वाजता भव्य स्वागत करण्यात आले. या दिंडीचे शहरात आगमन झाल्यानंतर अमळनेरकर महाराज यांच्या उपस्थितीत आजची संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरातील भागीरथी झाली. ज्येष्ठ महिन्यातील अमावास्याच्या संध्याकाळची भागीरथी जोपर्यंत अमळनेरकर महाराज यांचा दिंडी सोहळा संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात येत नाही तोपर्यंत त्यादिवशी येथील भागीरथी व पूजन होत नाही, अशी परंपरा आहे. अमळनेरकर महाराज यांचे स्वागत करताना सत्यनारायण लोहिया, डॉ. लक्ष्मीनारायण लोहिया, शिंगाडे, महेश जोशी, पिंपळे परिवार, कपिल कावसनकर, राजू कावसनकर, दत्तागुरू पोहेकर आदींसह भक्त परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. २४७ वर्षांपासून अखंड चालत आलेली परंपरा सद्गुरू सखाराम महाराज १७८० ते १८१८, गोविंद महाराज : १८१८ ते १८५१, बाळकृष्ण महाराज : १८५१ ते १८६८, प्रल्हाद महाराज : १८६८ ते १८८५, तुकाराम महाराज : १८८५ ते १८९६, कृष्णा महाराज : १८९६ ते १८९७, बाळकृष्ण महाराज (आंधळे) : १८९७ ते १९३०, वासुदेव महाराज : १९३० ते १९५२, पुरुषोत्तम महाराज : १९५२ ते १९६४, ज्ञानेश्वर महाराज : १९६४ ते १९८७, गुरुवर्य प्रसाद महाराज : १९८७ पासून आत्तापर्यंत. अशा प्रकारे मागील २४७ वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही चालू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *