![]()
पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १२१वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. या सोहळ्यात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार डॉ. श्रीकृष्ण काकडे यांना प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रतिभा रानडे म्हणाल्या की, जीवनाच्या वाटचालीत मी वेगवेगळ्या विचारधारांच्या संपर्कात आले, पण कुठल्या एका विचारधारेशी बांधून घेतले नाही. आजवरच्या लेखनाने खूप आनंद दिला. लेखनाच्या निमित्ताने आपल्या चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव पहायला शिकले. मध्यवर्गीय कवचाबाहेर पडण्याच्या सततच्या धडपडीतूनच मला जगण्याचे भान आले आणि माणसाच्या जगण्याकडे बघता आले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या सोहळ्याला ज्येष्ठ संगीतकार, गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते हृषिकेश जोशी आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण अध्यक्षस्थानी होते. प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, माधव राजगुरू, प्रसाद मिरासदार, डॉ. नितीन संगमनेरकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्रतिभा रानडे पुढे म्हणाल्या की, निसर्ग आणि माणसाचे जगणे याविषयी मला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. मी जिथे जिथे गेले, तिथला इतिहास, संस्कृती, सामाजिक, राजकीय स्थिती आणि धर्मसंस्कृती व राजकारणाचा सामान्य माणसावर झालेला परिणाम अभ्यासत गेले. यातून धर्मसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून चालतात, पण सामान्य माणूस मात्र संस्कृतीशी जोडला जातो, हे मला समजले. पंडित सत्यशील देशपांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, लेखकांना संगीताची संवेदना आकलन झाल्यास गद्य वाक्ये देखील लयदार होतात. बंदिशीतल्या शब्दांमधून संवेदना तीव्र, तीक्ष्ण झाल्यास बंदिशीचे सादरीकरण प्रभावी ठरते. गायकांनी देखील भवतालच्या वाङ्मयाचा अभ्यास करावा. छंदोबद्ध मुक्तछंदालाही लय असते; परंतु आज मुक्तछंद लिहिणाऱ्या कवींचा छंदाचा अभ्यास नाही, असे जाणवते. साहित्यकृतीतून साकारलेल्या शब्दांना वैयक्तिक आणि सामाजिक संदर्भ असतात आणि त्या संदर्भातून अर्थाच्या छटा बदलत राहतात. मनाला झालेल्या जाणीवांमधून उत्कृष्ट साहित्यकृतींची निर्मिती घडत असते. भावनेला शब्द करणे हे साहित्यिकाचे वैशिष्ट्य आहे.
Source link
प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार:१२१व्या वर्धापन दिनी डॉ. श्रीकृष्ण काकडे यांचाही सत्कार