![]()
शिवसेना ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पूर्णेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी पूर्णेकर यांचा जुना मित्र पप्या शिंदे याला अटक केली असून, आणखी 4 आरोपी फरार असल्याची माहिती आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या हत्येनंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी ठाण्यात जाऊन पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना या हत्येमागे ठाणे महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. पूर्णेकर कुटुंबीयांकडूनही मीनाक्षी शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांनंतर आता मीनाक्षी शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘माझ्या 20 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच असा आरोप’ मीनाक्षी शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावत पोलिस तपासाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. गेल्या 20 वर्षांपासून आपण राजकारणात असून, आपल्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच अशा प्रकारचा गंभीर आरोप होत असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात अनेकांशी वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत परिस्थिती जाण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पूर्णेकर यांची हत्या ज्या प्रभागात झाली, तो आपला प्रभाग असल्याचेही मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे नमूद करत त्यांनी या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे म्हटले आहे. आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने अशा प्रकारचे कृत्य केलेले नाही, असा दावा त्यांनी केला. ‘पुरावे असतील तर पोलिसांसमोर द्यावेत’ संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवरही मीनाक्षी शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. माझ्या घरी हत्येचा कट शिजला किंवा माझा या प्रकरणाशी संबंध आहे, असे सांगितले जात असेल, तर त्यासाठी ठोस पुरावे सादर करावे लागतील, असे त्या म्हणाल्या. सध्या एका कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये आणि समर्थकांमध्ये संताप असणे स्वाभाविक आहे. मात्र त्या भावनेतून कोणावरही आरोप करण्यापूर्वी त्याचा आधार काय आहे, याचा विचार केला पाहिजे, अशी भूमिका मीनाक्षी शिंदे यांनी मांडली. ‘धमकीच्या जुन्या वक्तव्याचा हत्येशी संबंध जोडू नका’ प्रदीप पूर्णेकर यांना निवडणुकीच्या काळात ‘बघून घेऊ’, अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यावर स्पष्टीकरण देताना मीनाक्षी शिंदे यांनी निवडणुकीच्या काळात प्रभागात राजकीय वाद आणि वैचारिक मतभेद झाले होते, हे मान्य केले. मात्र त्या काळातील वक्तव्याचा आता झालेल्या हत्येशी संबंध जोडणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पूर्णेकर यांच्याशी आपले कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते, असा दावाही त्यांनी केला. पूर्णेकर सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ आणि रील्स करत होते तसेच आपल्यावर आरोप करत होते, असे मीनाक्षी शिंदे यांनी म्हटले. जुन्या राजकीय वादांचा आधार घेऊन आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पप्या शिंदेसोबतच्या फोटोवरही स्पष्टीकरण या प्रकरणातील आरोपी पप्या शिंदे याच्यासोबत मीनाक्षी शिंदे यांच्या पतीचा फोटो असल्याचा मुद्दा आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यावरही मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक व्यक्तींसोबत फोटो काढले जातात. केवळ एखाद्यासोबतचा फोटो हा कोणत्याही गुन्ह्यातील सहभागाचा पुरावा ठरू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. पप्या शिंदे याच्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडीओचा संदर्भ देत तो ड्रग्जविरोधात काही उपक्रम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पूर्णेकर यांच्या सोशल मीडिया व्यवहारामुळे त्यांचे अनेकांशी वाद झाले होते आणि त्यांच्यामुळे काही लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती, असा दावाही मीनाक्षी शिंदे यांनी केला. मात्र या सर्व बाबींची सत्यता पोलिस तपासातूनच स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. ‘पोलिस चौकशीला सामोरे जाणार’ या संपूर्ण प्रकरणात पोलिस प्रशासन करत असलेल्या चौकशीला आपण सामोरे जाण्यास तयार असल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यास आपण स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपली या प्रकरणात कोणतीही चूक नसल्याचा दावा करत, तपास यंत्रणेला आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पूर्णेकर हत्या प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांदरम्यान आता पोलिस तपासातून नेमके कोणते तथ्य समोर येते, याकडे लक्ष लागले आहे. फरार 4 आरोपींचा शोध आणि अटक झालेल्या पप्या शिंदेची चौकशी यामधून हत्येमागील नेमके कारण आणि इतर संबंधित बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हेही वाचा… प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक:आदित्य ठाकरे-संजय राऊत ठाण्यात दाखल; गुन्हेगारांचे नाव FIR मध्ये टाकल्याशिवाय गर्दी हटणार नाही- राऊत ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मानपाडा परिसरातील क्लस्टर डेव्हलपमेंट आणि राजकीय वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत असून, पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर या हत्येचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सविस्तर वाचा…
Source link
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया:म्हणाल्या, ‘बिनबुडाचे आरोप, पोलिस चौकशीत सत्य समोर येईल’