![]()
आसाममध्ये संत शंकरदेव यांनी, तर महाराष्ट्रात संत ज्ञानदेव आणि संत तुकाराम महाराज यांनी मध्ययुगीन काळातील प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत आपल्या वाणी आणि लेखणीतून समाजजागृतीचे कार्य केले. या संतपरंपरेचा समान धागा ‘नामघरा’च्या माध्यमातून महाराष्ट्र आणि आसामला जोडत आहे. महाराष्ट्रातील ‘नामघर’ उभारणीमुळे दोन्ही राज्यांच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम झाला असून, महाराष्ट्र आणि आसामची वाणी जणू एकरूप झाली आहे, असे भावपूर्ण उद्गार आसाममधील जोरहाट येथील औनियाती सत्राचे विद्यमान सत्राधिकारी आणि औनियाती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्री श्री पीतांबर देव गोस्वामी यांनी काढले. सरहद, पुणेतर्फे गुजर-निंबाळकरवाडी येथील संस्थेच्या संकुलात उभारण्यात आलेल्या ‘नामघर’च्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नागालॅंड विद्यापीठाचे कुलपती आणि आसामचे माजी राज्य माहिती आयुक्त डॉ. समुद्रगुप्त कश्यप, डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. डॉ. गोस्वामी म्हणाले की, आसाममध्ये ‘नामघर’ हे केवळ धार्मिक उपासनेचे ठिकाण नसून ते तेथील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचे केंद्र आहे. महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यात प्रथमच अशा प्रकारचे ‘नामघर’ उभारले जाणे आजच्या सामाजिक परिस्थितीत औचित्यपूर्ण आहे. या उपक्रमाचे श्रेय सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांना जाते. नामघरातून संस्कारांची जपणूक ‘नामघर’ ही भक्ती परंपरेची निखळ आणि शुद्ध अभिव्यक्ती असल्याचे सांगत डॉ. गोस्वामी यांनी त्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. सत्कथा, सत्संग, सद्भावना, सद्वर्तन आणि सत्कर्म यांचे संस्कार नामघरातून मिळतात. ‘नाम’ हे नादब्रह्म आणि शब्दब्रह्माचे प्रतीक आहे. नामउच्चारण आणि नामकीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचा सामूहिक अनुभव येथे घेतला जातो. नाम हे हरी, विष्णू आणि श्रीकृष्णाचे असते. जिथे नाम असते, तिथे हरीचा वास असतो, अशी श्रद्धा आहे. नामघरात सामूहिक कीर्तनाच्या माध्यमातून ही भक्तीपरंपरा पुढे नेली जाते. त्यामुळे नामघराकडे केवळ धार्मिक स्थळ म्हणून पाहता येणार नाही. ते संग्रहालय, सभागृह आणि प्रसंगी नाट्यगृह म्हणूनही कार्य करू शकते. सांस्कृतिक प्रशिक्षणाचे केंद्र म्हणूनही त्याचे महत्त्व आहे. आपल्या पंचज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांना सत्कर्मासाठी प्रवृत्त करणारे संस्कार देणारे हे स्थान आहे. श्रद्धा आणि निष्ठेला बळ देणाऱ्या अशा नामघरात सातत्याने संकीर्तन घडत राहावे, असा आशीर्वादही डॉ. गोस्वामी यांनी दिला. शंकरदेव आणि महाराष्ट्रातील संतपरंपरेचा समान धागा डॉ. सदानंद मोरे यांनी आसाममधील विष्णुभक्ती परंपरा आणि महाराष्ट्रातील भागवत तसेच वारकरी परंपरेतील अनुबंध स्पष्ट केला. महाराष्ट्रातील संतांनी समाजाला जोडण्याचे, समता आणि मानवतेचे संस्कार देण्याचे काम केले. हाच विचार आसाममध्ये संत शंकरदेव यांनी पुढे नेला, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील संतांनी नामसंकीर्तन, भारूड आणि गवळणीच्या माध्यमातून समाजापर्यंत मानवतेचा संदेश पोहोचविला. त्याचप्रमाणे संत शंकरदेव यांनी आसाममध्ये वैष्णव भक्तीपरंपरा रुजविताना नाट्यकलेलाही उपासनेचा आणि समाजप्रबोधनाचा भाग बनविले. ही बाब महाराष्ट्र आणि आसामच्या संतपरंपरेतील साम्य अधोरेखित करणारी आहे, असे डॉ. मोरे यांनी नमूद केले. नामधारकासाठी केवळ मानवतेचा धर्म महत्त्वाचा आहे. जाती-धर्माच्या भेदांच्या पलीकडे जाऊन समाजाला एकत्र आणण्याचा संदेश महाराष्ट्रातील संतांनी आणि संत शंकरदेव यांनी दिला. त्यामुळे महाराष्ट्र आणि आसामला जोडणारा हा संतपरंपरेचा धागा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे, असेही डॉ. मोरे यांनी सांगितले. सांस्कृतिक संवादाला मिळणार बळ पुण्यात उभारण्यात आलेल्या ‘नामघर’मुळे महाराष्ट्र आणि आसाममधील सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि साहित्यिक संवादाला नवे व्यासपीठ मिळणार आहे. संत शंकरदेव यांच्या वैष्णव परंपरेचा आणि महाराष्ट्रातील वारकरी-संत परंपरेचा परिचय परस्परांना करून देण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावू शकते. भक्ती, मानवता, समता आणि सामाजिक ऐक्य या समान मूल्यांच्या माध्यमातून दोन्ही राज्यांतील सांस्कृतिक नाते अधिक दृढ होण्याची अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.
Source link
आसाम-महाराष्ट्राची वाणी 'नामघर'मुळे एकरूप – डॉ. गोस्वामी:सरहद संस्थेने पुण्यात उभारले सांस्कृतिक केंद्र; संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मोरे उपस्थित