Headlines

'द बॅटरी शो इंडिया' परिषदेनिमित्त पुण्यात गोलमेज चर्चा:ईव्ही उद्योगासाठी पुणे केंद्रस्थानी, 2032 पर्यंत 15 लाख ईव्ही विक्रीचा अंदाज




भारताच्या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) आणि ऊर्जा साठवणूक क्षेत्रातील वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर बॅटरी सेल, बीएमएस, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमेशन, चाचणी, सुरक्षा आणि पुनर्वापर या संपूर्ण पुरवठा साखळीचे देशांतर्गत सक्षमीकरण गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. ‘द बॅटरी शो इंडिया २०२६’च्या चौथ्या आवृत्तीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित गोलमेज परिषदेत ईव्ही व ऊर्जा साठवणुकीच्या भविष्यासह उद्योगातील संधींवर चर्चा झाली. इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियातर्फे आयोजित मुख्य प्रदर्शन २२ ते २४ ऑक्टोबरदरम्यान ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे होणार आहे. या प्रदर्शनात ३०० हून अधिक प्रदर्शक आणि ४०० पेक्षा जास्त ब्रँड सहभागी होणार असून, कोरिया, जपान, जर्मनी आणि चीनमधील कंपन्यांचाही सहभाग असेल. यासोबत ‘रिन्यूएबल एनर्जी इंडिया एक्स्पो’ आणि ‘एनर्जी स्टोरेज समिट इंडिया’चेही आयोजन करण्यात आले आहे. फ्रॉस्ट अँड सुलिव्हनचे रिसर्च डायरेक्टर (मोबिलिटी-ईव्ही) प्रज्योत साठे यांनी सांगितले की, २०२५ मध्ये भारतातील पॅसेंजर ईव्ही विक्री सुमारे १.७८ लाख युनिट्सवर पोहोचली आहे. २०३२ पर्यंत ही विक्री वार्षिक १५ लाख युनिट्सपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या ईव्ही घटकांचे ५० ते ६० टक्के स्थानिक उत्पादन होत असून, पुढील पाच-सहा वर्षांत हे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. इन्फॉर्मा मार्केट्सचे वरिष्ठ समूह संचालक रजनीश खट्टर यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशात १९.७ लाखांहून अधिक ईव्हीची नोंदणी झाली. त्यापैकी ११.५ लाखांहून अधिक दुचाकी होत्या. वाढत्या मागणीसाठी संपूर्ण बॅटरी पुरवठा साखळी भारतात विकसित करणे आवश्यक आहे. पुण्याची भूमिका यामध्ये महत्त्वाची असून, पिंपरी-चिंचवड परिसरातील चार हजारांहून अधिक उत्पादन व संलग्न घटक उद्योग या क्षेत्राला बळ देत आहेत. पाटील ऑटोमेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मनोज पाटील यांनी बॅटरी निर्मितीतील ऑटोमेशनचे महत्त्व अधोरेखित केले. लहान बॅटरी घटकांचे स्थानिक उत्पादन ३०-३५ टक्क्यांवरून ७०-८० टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असून, पुढील तीन-चार वर्षांत भारतीय ऑटोमेशन-लाईन क्षेत्रात ७०० ते ८०० कोटी रुपयांची संधी निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. रिप्लस इंजिटेकचे व्यवस्थापकीय संचालक हिरेन शहा यांनी सांगितले की, ऊर्जा साठवणुकीची क्षमता १ गिगावॉट अवरवरून ६ गिगावॉट अवरपर्यंत वाढवली जात आहे. अपारंपरिक ऊर्जेमुळे ग्रीड स्थिरीकरणासाठी बॅटरीची भूमिका वाढणार असून, २०२९ पर्यंत कंपनीचा व्यवसाय आठ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक होण्याची अपेक्षा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *