![]()
दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि उत्साहाची पर्वणी मानली जाते. मात्र, सध्या ग्रामीण भागात दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असून संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वेदनांची जाणीव समाजाला करून देण्यासाठी पैठण तालुक्यातील खादगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः आकर्षक आकाशकंदील तयार करून त्याद्वारे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, शेतकरी जगला तर देश जगेल आणि फटाक्यांचा खर्च कमी करूया, गरजू शेतकरी कुटुंबांना मदत करूया अशा आशयाचे प्रबोधनात्मक संदेश साकारले आहेत. दिवाळीचा सण साजरा करताना अनावश्यक खर्चाला फाटा देऊन संकटात असलेल्या शेतकरी कुटुंबांच्या जीवनातही आशेचा प्रकाश निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. उपक्रमामुळे कलागुणांना वाव मिळण्यासोबतच सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलतेचेही दर्शन घडले आहे. दिवाळीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील माणूसपणाचे घडलेले हे दर्शन खरोखरच कौतुकास्पद असल्याचे शिक्षकांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कलाशिक्षक गणेश गोजरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक परमेश्वर गोटे यांच्यासह सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
Source link
फटाक्यांचा खर्च कमी करूया, शेतकरी कुटुंबांना मदत करूया:खादगावच्या विद्यार्थ्यांचे कंदिलांतून सामाजिक प्रबोधन