![]()
प्रतिनिधी|अहिल्यानगर येथील भुईकोट किल्ला येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ॲलेक्स कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुलमोहर एफसीने फिरोदिया शिवाजियन्स युनायटेड एफसीवर २-० असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. गुलमोहर एफसीकडून पार्थ मस्कर याने दोन्ही गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे मानद सचिव रोनप फर्नांडिस, उपाध्यक्ष खालिद सय्यद, प्रदीप जाधव, व्हिक्टर जोसेफ, राजू पाटोळे, पल्लवी सैंदाणे, झोएब खान उपस्थित होते. विजयी व उपविजयी ठरलेल्या संघांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते चषक व रोख बक्षीस देण्यात आले. यासह स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू: नील धेंडवाल (फिरोदिया शिवाजियन्स युनायटेड), सर्वोत्कृष्ट गोलरक्षक: उनाध्य जाधव (गुलमोहर एफसी) यांना देखील सन्मानित करण्यात आले. अंतिम सामन्याचे पंच म्हणून जोनाथन जोसेफ, सुयोग महांगडे, ऋषभ मणी आणि प्रियांका अवारे यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजयी, उपविजयी संघाचे प्रायोजक तसेच अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी सैंदाणे यांनी करुन आभार मानले. गुलमोहर एफसी विरुद्ध फिरोदिया शिवाजियन्स युनायटेड यांच्यात सामना अटीतटीचा राहिला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच गुलमोहर एफसीने आक्रमक खेळी करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला. सामन्याच्या सातव्या मिनिटाला पार्थ मस्कर याने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमक चाली रचत बाराव्या मिनिटाला दुसरा गोल करत फिरोदिया शिवाजियन्स युनायटेड एफसीसमोर मोठे आव्हान उभे केले. दोन गोलने पिछाडीवर पडल्यानंतर फिरोदिया शिवाजियन्स संघाने पुनरागमनासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र गुलमोहर एफसीच्या भक्कम बचावफळीसमोर त्यांची रणनीती यशस्वी ठरली नाही. शेवटपर्यंत गोल करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही त्यांना खाते उघडता आले नाही. पार्थ मस्करच्या दमदार दुहेरी गोलच्या जोरावर गुलमोहर एफसीने २-० असा दणदणीत विजय मिळवला.
Source link
फुटबॉल स्पर्धेमध्ये "गुलमोहर''संघाने कोरले विजेतेपदावर नाव:अॅलेक्स कपचा थरार; पार्थ मस्करच्या दोन गोलने गुलमोहर एफसी संघ ठरला सरस