Headlines

बहीण पोलिस तर भाऊ सैन्यदलात दाखल:वडिलांनी खांद्यावरून काढली मिरवणूक, दापूरा गावाची ऐतिहासिक कामगिरी‎




अकोला जिल्ह्यातील अवघ्या २,२०० लोकसंख्येच्या छोट्याशा दापूरा गावातील दोन सख्या भावंडांनी एकाच वेळी शासकीय सेवेत रुजू होऊन इतिहास घडवला आहे. नेहा निरंजन मोहोड हिने गावातून पहिली महिला महाराष्ट्र पोलिस होण्याचा बहुमान मिळवला, तर तिचा भाऊ निखिल निरंजन मोहोड हा भारतीय सैन्यदलात दाखल झाला आहे. एकाच दिवशी दोन्ही अपत्यांनी देश आणि राज्य सेवेची वर्दी परिधान केल्यामुळे भारावून गेलेल्या शेतमजूर वडिलांनी लेकीला थेट खांद्यावर घेऊन गावातून विजय मिरवणूक काढली. हा अभूतपूर्व आणि भावूक सोहळा पाहताना आई-वडिलांसह उपस्थित सर्व गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. “लेक असावी तर अशी’, अशा शब्दांत गावकऱ्यांनी नेहाचे कौतुक केले. दापूरा येथील रहिवासी निरंजन मोहोड व त्यांची पत्नी सुषमा मोहोड हे शेतमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या तिन्ही मुली व एका मुलाला उच्चशिक्षित केले. त्यांनी मुलांना स्पर्धा परीक्षेचा महामंत्र दिला. नेहाने इंग्रजीतून एम.ए. केले असून निखिलने विज्ञान शाखेतून पदवी घेतली आहे. शेतातील कामे सांभाळत दोघांनीही सातत्याने अभ्यास सुरू ठेवला होता. यात अखेर त्यांच्या कष्टाला यश आले असून, आज दोन्ही मुले देशाच्या सेवेसाठी दाखल झाले आहेत. याचा सर्व ग्रामस्थांना हेवा अन् अभिमान वाटत आहे. सणासारखे वातावरण निखिल सैन्यदलातील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून गावी परतला आणि त्याच दिवशी नेहाची पोलिस दलात निवड झाल्याचे स्पष्ट झाले. या दुहेरी यशामुळे संपूर्ण दापूरा गावात सणासारखे वातावरण निर्माण झाले होते. या यशाबद्दल मोहोड कुटुंबावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *