Headlines

बीडमध्ये खडा पडला तरी पावती माझ्या नावावर:मी संघर्षातून घडलोय, आरोपांना घाबरत नाही, मी एवढा अस्वस्थ कधीच झालो नव्हतो- धनंजय मुंडे




बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली किंवा कुठलाही खडा पडला, तरी त्याची पावती थेट माझ्या नावावरच फाडली जाते आणि माझ्याविरोधात भाषणे सुरू होतात. केवळ एका व्यक्तीला सातत्याने बदनाम करून तुम्ही गावाची आणि परिसराची प्रगती थांबू शकत नाही. काल माझ्या संपूर्ण जीवनात मी एवढा अस्वस्थ कधीच झालो नव्हतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी येथील एका कार्यक्रमात बोलताना राजकीय प्रवासातील संघर्षावर भाष्य केले. धनंजय मुंडे म्हणाले की, कोणाचे काय, कधी आणि कुठे झाले? हे मला माहिती नसते. तो माणूस कोणत्या जातीचा आहे, हेही मला माहीत नसते. त्या घटनांशी माझा काहीही संबंध नसतो; पण काही झाले की ‘वाजवा धन्याला’ अशी भूमिका घेतली जाते. मी काय केले आहे? या सगळ्याचा माझ्यावर राजकीयदृष्ट्या परिणाम होत नाही, कारण मी सुरुवातीपासून संघर्षाचे जीवन जगलो आहे. मी असंख्य आरोप सहन करेन आणि गरज पडल्यास आरोप करेनही. मात्र, आजपर्यंत मी कधीही पुरावा असल्याशिवाय कोणावरही एकही आरोप केलेला नाही. सिमेंट कंपनी सहजासहजी आलेली नाही धनंजय मुंडे म्हणाले की, वस्तूस्थिती अशी आहे की एका व्यक्तीला बदनाम केल्यामुळे संपूर्ण परिसराच्या विकासावर परिणाम होतो. परळीमध्ये आज जी सिमेंट कंपनी आली आहे, ती सहजासहजी आलेली नाही. मी माझ्याकडे असलेले राखेचे टेंडर त्यांना मोफत दिले, तेव्हा कुठे ती कंपनी परळीत उभी राहिली. विकास करण्यासाठी अशा प्रकारे गतीरोधक टाकण्याची मानसिकता आता बदलण्याची नितांत गरज आहे. शिक्षणाने-उद्योगाने परळीचा आर्थिक विकास धनंजय मुंडे म्हणाले की, मी कृषीमंत्री असताना या मतदारसंघात कृषी महाविद्यालय आणले. तसेच पंकजा ताई मुंडे यांनी त्या मंत्री असताना मतदारसंघात शासकीय महाविद्यालय आणले. हाच खरा विकास आहे. अशा शिक्षण संस्थांमुळे बाहेरून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी राहायला येतील आणि त्यांच्यामुळे परळीच्या स्थानिक अर्थकारणाला मोठी गती मिळेल. त्यामुळे निव्वळ एका व्यक्तीला बदनाम करून हा विकास रोखता येणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *