Headlines

बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतलाय का?:धमकी प्रकरणावर हर्षवर्धन सपकाळांचा संताप, गायकवाडांवर टीका




शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेल्या धमकीनंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत गायकवाडांवर जोरदार टीका केली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच त्यांनी उचलल्याचा आरोप करत सपकाळ यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून हल्लाबोल केला आहे. दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी अनेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून हा वाद सुरू झाला. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून संजय गायकवाड यांनी शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने अधिकच गंभीर वळण घेतले. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी गायकवाडांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आमदार निवासातील कँटीनमध्ये हाणामारी करणे, सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांकडून स्वतःची गाडी धुवून घेणे आणि आता प्रकाशकाला धमकी देणे अशा अनेक घटनांमुळे गायकवाड सातत्याने वादात आहेत. एका लोकप्रतिनिधीने अशी भाषा वापरणे आणि अशा प्रकारे वागणे हे अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. सपकाळ यांनी पुढे अधिक कठोर शब्दांत टीका करत म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचीदेखील गायकवाड यांची पात्रता नाही. त्यांच्या बोलण्याची पातळी आणि वापरलेली भाषा पाहता महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवरायांनी घालून दिलेल्या मूल्यांना तडा देण्याचे काम अशा वागणुकीतून होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीबाबतही सपकाळ यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला. ‘पानसरे यांचे जे झाले तेच करू’ अशा स्वरूपाची धमकी देण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तसेच या घटनेत कोणाचा सहभाग आहे का, याची चौकशी करण्याचे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे. आंबी यांना सुरक्षा देण्याची मागणी दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधत कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रशांत आंबी यांना तातडीने सुरक्षा देण्याची मागणीही पुढे आली आहे. आता या प्रकरणावर सरकार काय भूमिका घेते आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *