![]()
मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून देशभरात राजकीय वादंग पेटले असताना, राज्य सरकारमधील संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. “एसआयआरच्या माध्यमातून मतदार याद्यांमधील केवळ दुबार आणि बोगस नावे वगळली जात आहेत. विरोधकांकडे कोणताही जनाधार उरलेला नसल्याने ते निवडणूक आयोगावर खापर फोडत आहेत. बोगस मतांच्या आधारे निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांची अवस्था सध्या ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी झाली आहे,” असा सडकून टोला महाजन यांनी लगावला. यावेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या पक्षावर निशाणा साधतानाच, आमदार बच्चू कडू यांचे दावे, मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर भाष्य केले. राज ठाकरेंकडे जनाधार नाही; बोगस मतांवर निवडून यायचे आहे का? मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत विरोधक राजीनाम्याची मागणी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाजन म्हणाले, “राज ठाकरे यांच्या विधानांवर आता काय बोलावे, हेच मला समजत नाही. एसआयआरमुळे मतदार यादी स्वच्छ होत असून डुप्लिकेट नावे कमी केली जात आहेत. जर कोणाचे नाव चुकून वगळले गेले असेल, तर त्यांना आजही नाव नोंदवण्याची आणि फॉर्म भरण्याची पूर्ण संधी आयोगाने दिली आहे. असे असताना विरोधक नेमक्या कोणत्या आधारावर आक्षेप घेत आहेत?” जनता निवडून देत नाही म्हणून आयोगावर खापर “काँग्रेस असो, शरद पवारांची राष्ट्रवादी असो किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना; जनतेने त्यांना नाकारले आहे. त्यांच्या पाठीशी जनाधार राहिलेला नाही. बोगस मतांच्या जोरावर निवडून येता येईल असा जर विरोधकांचा गैरसमज असेल, तर तो त्यांनी मनातून काढून टाकावा. काम करायचे सोडून प्रत्येक गोष्टीत संशय घेणे म्हणजे निव्वळ ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असा प्रकार आहे.” बच्चू कडूंनी सत्तेत नसल्यासारखे वागू नये; मंत्रिमंडळ फेरबदलावर चिमटा शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी दिवाळीत मंत्रिमंडळात मोठा खांदेपालट होणार असल्याचा आणि महागाईवर केलेल्या विधानाचा महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला. “दिवाळीनंतर मंत्रिमंडळात खांदेपालट होणार आहे की नाही, हे बच्चू कडू यांनाच जास्त ठाऊक असेल. मला तरी सध्यातरी अशा कोणत्याही बदलाची अजिबात माहिती नाही,” असा टोला त्यांनी लगावला. “बियाणे, डिझेल महाग झाले पण शेतमालाला भाव नाही, असे वक्तव्य बच्चू कडू करतात. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ते स्वतः सत्ताधारी महायुतीचा भाग आहेत. सत्तेत राहून अशा प्रतिक्रिया देणे योग्य नाही. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे असतील, तर त्यांनी थेट सरकारसमोर आणि मुख्यमंत्र्यांसमोर मांडावेत. आपण विरोधी पक्षात असल्यासारखे वागणे बंद करावे.” पाचोराचे आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद देण्याच्या मागणीवर बोलताना ते म्हणाले, “किशोर आप्पांना मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही, हा पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा (शिवसेना शिंदे गट) अंतर्गत विषय आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच अंतिम निर्णय घेतील.” दुष्काळात सरकार खंबीर; पंचनामे पूर्ण करून तातडीने भरपाई देणार राज्यातील पावसाच्या तुटीवर आणि निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर दिलासा देताना गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. “यंदा पावसाने सुरुवातीला महिनाभर दडी मारली आणि पेरण्या झाल्यानंतरही मोठा खंड पडला. त्यामुळे खरीप पिके उद्ध्वस्त झाली असून पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, बळीराजाने अजिबात चिंता करू नये, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.” दुष्काळाचे पंचनामे करण्यासाठी महसूल आणि कृषी यंत्रणा शेताच्या बांधावर उतरली आहे. हे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून पात्र बाधित शेतकऱ्यांना कोणतीही दिरंगाई न करता थेट नुकसानभरपाई दिली जाईल. “येत्या नवरात्रोत्सवाच्या काळात राज्यात समाधानकारक परतीचा पाऊस पडावा, धरणे आणि नदी-नाले भरून पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटावा आणि शेतकऱ्यांचा आगामी रब्बी हंगाम तरी सुगीचा जावा, अशी प्रार्थना आम्ही विघ्नहर्त्या चरणी करतो,” असेही ते म्हणाले. ————————- हेही वाचा…. विसर्जनानंतर जुहू चौपाटीवर ‘सी शोअर शाइन 2026’: अजय देवगण, अमृता फडणवीस आणि पालिका आयुक्तांकडून स्वच्छता मोहीम गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकांनंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर साचलेला कचरा व निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात आले. प्रसिद्ध जुहू चौपाटीवर ‘दिव्यज फाऊंडेशन’, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सी शोअर शाइन २०२६’ या विशेष बीच क्लीन-अप मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, सामाजिक कार्यकर्त्या व दिव्यज फाऊंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, दिविजा फडणवीस यांच्यासह अनेक सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष चौपाटीवर उतरून श्रमदान केले. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
बोगस मतांवर निवडीचे स्वप्न पाहणाऱ्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे!:SIR वादावरून मंत्री गिरीश महाजन यांचा राज ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार पलटवार