Headlines

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’ नाणीजधामच्या दिशेने:नागपूरच्या पूर्व विदर्भ उपपीठातून हजारो वारकऱ्यांचा सहभाग; 25 सप्टेंबर नांदेडमध्ये दाखल




पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश घेऊन निघालेल्या ‘वसुंधरा पायी दिंडी 2026’ चे शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी श्रीक्षेत्र मोहगाव झिल्पी, ता. हिंगणा, जि. नागपूर येथील रामानंद संप्रदायाच्या पूर्व विदर्भ उपपीठातून प्रस्थान झाले. या दिंडीत हजारो वारकरी सहभागी झाले असून नागपूर ते श्रीक्षेत्र नाणीजधाम, जि. रत्नागिरी असा शेकडो किलोमीटरचा प्रवास ते पायी करणार आहेत. ही दिंडी आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी नांदेडमध्ये पोहचली. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सलग चौथ्या वर्षी ही दिंडी काढण्यात आली आहे. 21 ऑक्टोबर 2026 रोजी श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांचा 60 वा वाढदिवस सोहळा होणार असून त्याच दिवशी विविध भागांतून निघालेल्या वसुंधरा पायी दिंड्या नाणीजधाम येथे दाखल होणार आहेत. पूर्व विदर्भासह तेलंगणा, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मराठवाड्यातील परभणी, मुंबईतील वसई, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि गोवा अशा सात उपपीठांतूनही दिंड्या नाणीजधामच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. ‘वसुंधरा पायी दिंडी’च्या माध्यमातून जागतिक तापमानवाढ, वृक्षसंवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. विशेष म्हणजे केवळ संदेश देण्यापुरते हे अभियान मर्यादित न ठेवता दिंडीच्या व्यवस्थेतही पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे. दिंडीच्या प्रवासादरम्यान दररोज वृक्षारोपण केले जात असून दिंडी पुढे गेल्यानंतर त्या परिसरात कचरा अथवा अस्वच्छता राहणार नाही, याचीही दक्षता घेतली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *