Headlines

उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिवेंद्रसिंहराजेंची सावध भूमिका:म्हणाले- ‘बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी, चांगली चालली पाहिजे आणि टिकली पाहिजे’




सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, शिवेंद्रसिंहराजे यांनी या विषयावर स्पष्ट राजकीय भूमिका घेण्याचे टाळत, ‘आमची कोणतीही चर्चा झालेली नाही,’ एवढेच सांगितले. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उदयनराजें भोसले यांचेशी काही चर्चा झाली आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शिवेंद्रसिंहराजे यांनी त्याला नकार दिला. ‘जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात कोणाचीच कोणाबरोबर चर्चा नाही. या निवडणुकीविषयी मी कोणतेही भाष्य करू शकत नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. उदयनराजेंनी पहिल्याच दिवशी अर्ज दाखल केल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला राजकीय रंग चढला आहे. विविध गटांकडून उमेदवारीची जुळवाजुळव आणि संभाव्य आघाड्यांबाबत हालचाली सुरू होण्याची शक्यता असतानाच शिवेंद्रसिंहराजेंनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे पुढील काळात भोसले कुटुंबीयांची भूमिका काय राहणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, राजकीय समीकरणांपेक्षा बँकेच्या भवितव्यावर भर देताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील आणि राज्यातील एक नंबरची बँक आहे. ती शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. त्यामुळे बँक चांगली चालली पाहिजे आणि टिकली पाहिजे.’ पहिल्याच दिवशी सहा अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीची सुरुवातच लक्षवेधी ठरली आहे. आगामी काळात उमेदवारी आणि राजकीय जुळवाजुळवीचे चित्र स्पष्ट होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *