Headlines

अशोक खरात प्रकरण उघडकीस आणणाऱ्या पत्राकराला अटक:खंडणी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, काय आहे नेमके प्रकरण? वाचा सविस्तर




अशोक खरात प्रकरणामुळे चर्चेत आलेला पत्रकार दत्तात्रय पोपट खेमनार हा पुन्हा एकदा एका गंभीर गुन्ह्यामुळे गोत्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्याबाद येथे एका महिला ग्रामविकास अधिकाऱ्याकडे स्मशानभूमीच्या विकासकामात तब्बल 1 लाख रुपयांची खंडणी मागून त्याने जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या धक्कादायक प्रकारानंतर लोणी पोलिसांनी कारवाई करत या कथित पत्रकाराला रात्री उशिरा अटक केली आहे. फत्त्याबाद ग्रामपंचायत कार्यालयात 2022 पासून ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या 45 वर्षीय माधवी नामदेव पलघडमल यांनी यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, सध्या फत्त्याबाद गावात स्मशानभूमीत मुरुम टाकून जमीन सपाट करण्याचे शासकीय स्तरावरील काम सुरू आहे. याच चालू कामात अडथळा निर्माण करून आरोपीने स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. धमक्यांचे सत्र आणि खंडणीची मागणी गेल्या 10 ते 12 दिवसांपासून आरोपी दत्तात्रय खेमनार हा या महिला अधिकाऱ्याला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होता. “मी भल्या-भल्यांना कामाला लावतो, मला स्मशानभूमीच्या कामातून 1 लाख रुपये द्यावे लागतील. नाहीतर काम करू देणार नाही आणि खोट्या प्रकरणात अडकवून तुझी नोकरी घालवेन,” अशी धमकी त्याने अधिकाऱ्याला दिली होती. दहशतीपोटी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर आरोपीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला आणि नोकरी जाण्याच्या धमक्यांना घाबरून महिला अधिकाऱ्याने 14 सप्टेंबर रोजी त्याला 1,100 रुपये ऑनलाईन पाठवले होते. मात्र, एवढ्यावरच न थांबता खेमनारचा पैशांसाठीचा तगादा सुरूच होता. याशिवाय, या विकासकामासाठी मुरूम पुरवठा करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडूनही त्याने पैसे उकळल्याची बाब पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करत अटक अखेर या जाचाला कंटाळून महिला अधिकाऱ्याने लोणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दत्तात्रय खेमनार याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा, खंडणी आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *