Headlines

गणेश मंडळाच्या जेवणाच्या वादात मध्यस्थी करणाऱ्यावर हल्ला:डोक्यात भातवाढीने मारून जखमी केले, फरासखाना पोलिसांकडून तपास सुरू




गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर आयोजित गणेश मंडळाच्या जेवणाच्या कार्यक्रमात सुरू झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी भातवाढी मारून त्यांना जखमी केल्याची घटना गणेशपेठेतील शुक्रवार आळीत घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे एक वाजता शुक्रवार आळीतील एका ताडपत्री दुकानासमोर ही घटना घडली. तानाजी मित्र मंडळाच्या मिरवणुकीनंतर मंडळातर्फे जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. अविनाश दत्तात्रय येनपुरे हे तेथे जेवणासाठी गेले होते. त्या वेळी जेवणाच्या कारणावरून त्यांचे मित्र विनायक घोरपडे आणि मंडळातील अक्षय हादगे यांच्यात वाद सुरू झाला. येनपुरे यांनी वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘तू मंडळाचा सदस्य नाहीस, तुझा काय संबंध?’ असे म्हणत अक्षयने हातातील लोखंडी भातवाढी त्यांच्या डोक्यात मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर त्यांना लाथ मारून खाली पाडल्याचाही आरोप आहे. या हल्ल्यात येनपुरे जखमी झाले. जखमी अवस्थेत येनपुरे यांनी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात याबाबत आरोपींविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.जेवणाच्या कार्यक्रमात उद्भवलेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याचे तक्रारीतून समोर आले आहे. अद्याप या प्रकरणात कोणाला अटक करण्यात आली नाही.घटनेचा पुढील तपास फरासखाना पोलिसांकडून करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *