![]()
गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणाविरोधात पुणेकरांनी सुरू केलेल्या लढ्याला पहिल्या टप्प्यात अंशतः यश मिळाले; मात्र विसर्जनाच्या दिवशी अनेक ठिकाणी ध्वनिमर्यादांचे उल्लंघन झाल्याचा दावा लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाने केला आहे. मंचाने तयार केलेल्या ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीवर पुणे शहरातून १५८ तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यापैकी ६० तक्रारींमध्ये १०० डेसिबल किंवा त्याहून अधिक आवाजाची नोंद झाल्याचे मंचाने म्हटले आहे. मंचाचे समन्वयक मुकुंद किर्दत यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबरच्या विसर्जनाच्या दिवशी सर्वाधिक ५९ तक्रारी नोंदल्या गेल्या. २० सप्टेंबरला २७, तर १४ सप्टेंबरला १९ तक्रारी आल्या. १५८ पैकी ९१ नागरिकांनी पोलिसांकडे ११२ किंवा व्हॉट्सॲपद्वारे तक्रार केल्याचे नमूद केले आहे. बाजीराव रस्ता-नातूबाग गणपती मंडळ परिसरातून सर्वाधिक १८ तक्रारी आल्या. त्यानंतर कोथरूड सात, हिंगणे खुर्द पाच, तर धनकवडी, कोरेगाव पार्क आणि आंबेगाव येथून प्रत्येकी चार तक्रारी नोंदल्या गेल्या. ध्वनिप्रदूषणाविरोधात नागरिकांना थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार करता यावी, यासाठी मंचाने सॉफ्टवेअर आधारित प्रणाली तयार केली होती. त्याद्वारे तक्रारींची माहिती रिअल टाइममध्ये पाठवण्यात आल्याचा दावा मंचाने केला आहे. काही ठिकाणी तक्रारीनंतर आवाज कमी झाला; मात्र अनेक ठिकाणी तक्रारींचे समाधानकारक निवारण झाले नसल्याचे मंचाचे म्हणणे आहे. शांतता क्षेत्रांचे मार्किंग, ध्वनिमर्यादांची अंमलबजावणी, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई आणि न्यायालयीन आदेशांची प्रभावी अंमलबजावणी याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी मंचाने केली आहे. भविष्यात कोणत्याही धर्म, जात किंवा राजकीय कार्यक्रमातील कर्णकर्कश ध्वनीविरोधात आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही मंचाने व्यक्त केला आहे.
Source link
विसर्जनाच्या दिवशी कर्णकर्कश आवाजाच्या 59 तक्रारी:लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाचा दावा, 60 ठिकाणी 100 डेसिबलपेक्षा जास्त आवाज