Headlines

खाजगी व्यक्तीकडून विज कंपनीची कामे करून घेतल्यास थेट बडतर्फी:झिरो लाईनमन प्रकाराला बसणार आळा, संचालक धनंजय औंढेकर यांचे आदेश




राज्यात खाजगी किंवा अनाधिकृत व्यक्तींकडून विज वाहिन्यांवर कामे करून घेतली जात असल्याच्या प्रकारानंतर विज कंपनीचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी तातडीचे पत्रक काढले असून असे प्रकार आढळून आल्यास थेट बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील झिरो लाईनमेन या प्रकारालाच आळा बसणार आहे. राज्यात अनेक वेळा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांकडून अनाधिकृत किंवा खाजगी व्यक्तीकडून कामे करून घेतले जात असल्याचे चित्र आहे. यामध्ये प्रामुख्याने नादुरुस्त वितरण रोहित बदलणे, डीओ फ्यूज बदलणे, वीज वाहिनीवरील बिघाड शोधणे, वीज पुरवठा संबंधी तक्रारी सोडवणे या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती असतांनाही खाजगी व्यक्तीचा वापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच अमरावती जिल्हयात विज वाहिनीवर काम करतांना खाजगी व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर रविवारी ता. 20 हिंगोली जिल्ह्यातील पार्डी पोहकर येथे डीओ बदलण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा रोहित्रावर भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभुमीवर विज कंपनीचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी तातडीने पत्र काढले आहे. यामध्ये कंपनीच्या कामकाजासाठी संबंधित कर्मचाऱ्याने खाजगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळ यांचा वापर करणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामुळे विद्युत किंवा यांत्रिक अपघात होऊन संबंधित व्यक्ती, कंपनीचे कर्मचारी यांना प्राणांतिक किंवा अप्राणांतिक अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारे मनुष्यबळाच्या वापरामुळे कंपनीची प्रतिमा जनमानसात मलीन होत असून कंपनीच्या विविध स्तरांवर स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्राहक यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करून कंपनीचे कोणतेही काम केल्याचे किंवा अशा प्रकारच्या गैरवर्तणुकीमुळे संबंधित व्यक्ती, कंपनीचे कर्मचारी, ग्राहक यांना प्राणांतिक किंवा अप्राणांतिक अपघात झाल्याचे व कंपनीच्या मालमत्तेस हानी पोहोचल्याचे निदर्शनास आल्यास अशा प्रकरणी विभागीय स्तरावर चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशीअंती सेवाविनियमांतील तरतुदींनुसार दोषी कर्मचाऱ्याविरुद्ध बडतर्फ किंवा सेवासमाप्ती सारखी कारवाई करण्याचे आदेश औंढेकर यांनी दिले आहेत. हे अधिकारी करणार तपासणी या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याबाबत क्षेत्रीय कार्यालयातील मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये वीज वितरणाच्या कामांमध्ये अनधिकृत मनुष्यबळाचा वापर होत नसल्याची खातरजमा वेळोवेळी करणार आहेत. कायदा काय सांगतो? सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी रेग्युलेशन्स, 2023 मधील रेग्युलेशन तीननुसार केवळ अधिकृत व्यक्ती हा वीज वितरण सेवा संबंधी कामे करू शकतो किंवा विद्युत वाहिन्या व विद्युत उपकरणांवर काम करण्यास पात्र असतो. त्यामुळे अनधिकृत, अपात्र किंवा कंपनीद्वारे अधिकृत नामनिर्देशित न केलेल्या खासगी व्यक्तीस कंपनीच्या विद्युत यंत्रणेवर कोणत्याही प्रकारची कामे करण्यास परवानगी देणे, त्याच्याकडून काम करून घेणे हे कृत्य बेकायदेशीर व अनधिकृत स्वरूपाचे आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनीच कामे करणे आवश्‍यक- धनंजय औंढेकर, संचालक (विज कंपनी) विज कंपनीकडून शहरी व ग्रामीण भागात कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्या त्या कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमुन दिलेली कामे करणे अपेक्षीत आहे. मात्र ग्रामीण भागातून खाजगी व्यक्तीकडून कामे करून घेतल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती धनंजय औंढेकर यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *