![]()
हिंगोली जिल्हा परिषदेच्या वतीने वसई (ता.औंढा) येथे सेवा संकल्प अभियानात शनिवारी ता. २६ आयोजित आरोग्य शिबिरात अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी प्रशासकिय कामकाजासोबतच रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य विषयक सल्लाही दिला. या शिवाय गावातील विकास कामांची माहितीही घेतली. हिंगोली जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान सुरू आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, केशव गड्डापोड, विजय बोराटे यांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये गाव पातळीवर जाऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ दिला जात आहे. दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्यातील वसई येथे शनिवारी, दुपारी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांच्या पथकाने भेट देऊन विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याशिवाय वृक्षलागवड, प्लास्टिकमुक्त गाव, सेवा सेतू अभियानांतर्गत गावकऱ्यांचे प्रलंबित दाखले देण्यात आले. यावेळी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी विस्ताराधिकारी प्रदीप बोंढारे यांच्यासह त्यासाठी वैद्यकिय पथक देखील हजर होेते. यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ठोंबरे यांनी गावातील प्रशासकिय कामकाज आटोपल्यानंतर रुग्णांची तपासणीही केली. अमरावती येथे बीएएमएस अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. ठोंबरे यांच्यासह वैद्यकिय पथकाने या शिबीरात गावातील १०० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी केली. यामध्ये प्रामुख्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, संधीवाताचे रुग्ण अधिक असल्याचे आढळून आले. या शिबीरात डॉ. ठोंबरे यांनी रुग्णांना आरोग्य विषयक सल्ला देेऊन नियमित व्यायाम करणे, पौष्टीक आहाराचे महत्व देखील सांगितले. जिल्हा परिषदेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी प्रशासकिय कामकाज पाहून केलेली रुग्ण सेवा गावकऱ्यांसाठी कौतूकाचा विषय बनली आहे.
Source link
औंढ्यात आरोग्य तपासणी शिबीर:प्रशासकीय कामकाजासोबतच अतिरिक्त सीईओं डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली आरोग्य सेवा