![]()
बँक कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित संपामुळे बँकिंग व्यवहारांवर होणारा परिणाम लक्षात घेता, वीजग्राहकांनी 28 सप्टेंबरपूर्वी आपले वीजबिल ऑनलाईन पद्धतीने भरून संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. संपाचा बँकिंग व्यवहारांवर होणार परिणाम बँक कर्मचाऱ्यांनी 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत संपाचा इशारा दिला आहे. यामुळे या दिवसांत बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अनेक वीजग्राहक आपले वीजबिल धनादेशाद्वारे (चेक) भरत असल्यामुळे, या काळात वीजबिल भरणा व संकलन प्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो. ‘प्रॉम्प्ट पेमेंट’ आणि ‘ड्यू डेट’ असलेल्या ग्राहकांसाठी सूचना ज्या वीजग्राहकांची प्रॉम्प्ट पेमेंट (तत्पर देयक भरणा) सवलतीची तारीख तसेच ड्यू डेट (अंतिम भरणा दिनांक) 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान आहे, अशा ग्राहकांनी वेळेत बिल भरून सवलतीचा लाभ घेण्यासाठी आणि विलंब आकार (लेट फी) टाळण्यासाठी 28 सप्टेंबरपूर्वीच डिजिटल माध्यमातून बिल भरावे. घरबसल्या ऑनलाईन भरणा सुविधा उपलब्ध ग्राहकांनी महावितरणची अधिकृत वेबसाईट, मोबाईल ॲप तसेच इतर उपलब्ध डिजिटल पेमेंट सुविधांचा (UPI, नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड) वापर करून घरबसल्या वीजबिलाचा भरणा करावा. छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील बहुसंख्य ग्राहक नियमितपणे ‘प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट’चा लाभ घेत आहेत. त्यामुळे सर्व ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने वेळेत बिल भरून सवलतीचा लाभ घ्यावा आणि संपामुळे होणारा मनस्ताप टाळावा, असे आवाहन महावितरणच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Source link
वीजबिल भरा ऑनलाईन:बँक संपामुळे महावितरणचे आवाहन; चेक दिल्यास होणार खोळंबा