![]()
कौटुंबिक कलहातून दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील कर्मचारी विजय कोळी यांचा मृतदेह शनिवारी (२६ सप्टेंबर) सकाळी निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथील बस डेपो परिसरात आढळून आला. कोळी यांनी सरकारी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात खळबळ उडाली आहे. कोळी हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या मुख्यालयात रेडिओ टेलिग्राफिक पोलिस कॉन्स्टेबल (आरटीपीसी) म्हणून नियुक्तीला होते. पोलिसांच्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. घरातून निघताना त्यांच्याकडे सरकारी पिस्तुल असल्याचे समोर आल्याने पोलिस यंत्रणेने त्यांचा शोध सुरू केला. कोळी यांचे शेवटचे लोकेशन निगडीतील दुर्गादेवी टेकडी परिसरात आढळले होते. त्यामुळे पोलिस पथकांनी या भागात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. त्यासाठी ड्रोनचीही मदत घेण्यात आली. मात्र, दोन दिवसांच्या शोधानंतरही त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान, शनिवारी सकाळी ट्रान्सपोर्टनगर येथील बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी त्यांचे सरकारी पिस्तुलही मिळून आले. प्राथमिक तपासात डोक्यात गोळी लागल्याचे आढळले असून, त्याच सरकारी पिस्तुलातून गोळी झाडल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असून, पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
Source link
पिंपरी-चिंचवड पोलिसाचा मृतदेह बस डेपोत आढळला:दोन दिवसांपासून बेपत्ता होते, सरकारी पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय