![]()
भगवान शिव हे सृष्टीचे मूळ आहेत. भगवान परमात्म्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. अंत:काळी भगवानाचे नामस्मरण झाले तरी कुकर्म नष्ट होतात.आयुष्यभर संसारात अडकलेल्या माणसाला अंत:काळी देव आठवणार कसा? असा मार्मिक प्रश्न विचारत स्नेहगंगाश्री आळंदीकर माई यांनी भक्ता
.
नामस्मरणात मोठी ताकद आहे. मुखामध्ये देवाचे नाव घेण्यासाठी पूर्वजन्मीचे पुण्य लागते. ज्यांनी जन्मोजन्मी भजन केले त्यांनाही शेवटच्या क्षणी देव आठवेलच याची खात्री नसते, असेही त्यानी सांगितले.
अधिक मासानिमित्त करमाळा शहरातील संत गजानन महाराज मंदिर परिसरात सुरू असलेल्या भव्य शिव महापुराण महाकथेला करमाळा शहरासह तालुकाभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. संत गजानन महाराज मंदिराला बारा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सातदिवसीय आध्यात्मिक पर्वामुळे करमाळा शहर अक्षरशः शिवमय झाले आहे.
दि. १५ ते २१ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या शिवमहापुराण महाकथेचे निरूपण सुश्री स्नेहगंगाश्री आळंदीकर यांच्या वाणीतून होत आहे. कथा झांकी, संगीतमय सादरीकरण आणि प्रभावी विवेचनामुळे भाविक भक्तिरसात तल्लीन होत असून, दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. महाकथेच्या पहिल्या दिवशी श्री गणेश कथेचे निरूपण करण्यात आले. कथा झांकीसह संगीतमय पद्धतीने सादर करण्यात आल्याने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. या महाकथेचे मुख्य यजमान संगीता खाटेर व श्रेणीक खाटेर यांनी प्रमुख भूमिका बजावली. संत गजानन महाराज मंदिर भक्त परिवाराच्या वतीने रंजना कुरुलकर यांनी कथा व्यासपीठावरील स्नेहगंगाश्री आळंदीकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कथेदरम्यान त्यांनी शिव महापुराणातील विधेश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटीरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायवीय संहिता यांचे महत्त्व स्पष्ट केले. रुद्रसंहितेमधील सती खंड, सृष्टी खंड, पार्वती खंड, कुमार खंड आणि युद्ध खंडातील प्रसंग आगामी दिवसांत कथेतून साकारले जाणार असल्याचे आळंदीकर यांनी सांगितले.
शिव महापुराण ग्रंथाची मिरवणूक शिव महापुराण कथेच्या प्रारंभी दि. १५ मे शिव महापुराण ग्रंथाची वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, भगवे ध्वज, टाळ-मृदंगाचा निनाद आणि हर हर महादेवच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालगोपाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.