![]()
पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज मार्गावरील राजमाता भुयारी मार्गावरील पुलावर एका ऑटो चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात हल्लेखोर रिक्षा चालकावर कोयत्याने सपासप वार करत असल्याचे दिसून येत आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात भीतीची लाट पसरली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सूरज माणिक काळे (30, रा. कात्रज) असे जखमी ऑटो चालकाचे नाव आहे. ते कात्रज परिसरात ऑटो चालवण्याचे काम करतात. त्यांच्यावर सोमवारी सकाळी 10.15 च्या सुमारास कात्रज ते नवले ब्रिज दरम्यान असलेल्या राजमाता भुयारी मार्गावरील पुलावर कोयत्याने भयंकर हल्ला करण्यात आला. हा हल्ला एवढा भयंकर होता की, कोयत्याच्या वाराने सूरज काळे पुलावरून खाली रस्त्यावर पडले. कोयत्याचा हल्ला व वरून खाली पडल्यामुळे ते जबर जखमी झाले. त्यांच्यावर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. पॅसेंजर भरण्याच्या जुन्या वादातून हल्ला पोलिसांच्या माहितीनुसार, सूरज काळे यांचा दोन – तीन वर्षांपूर्वी आरोपी बापू भोसले, गणेश मोरे व गणेश धरपाळे यांच्यासोबत प्रवाशी भरण्यावरून वाद झाला होता. याचा राग आरोपींच्या मनात होता. याच रागातून त्यांनी सोमवारी सूरजला राजमाता भुयारी मार्ग पुलावर गाठले. तिथे त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला चढवला. धक्कादायक गोष्ट आरोपी हा हल्ला सुरू असताना आजूबाजूने अनेकजण जात होते. पण कुणीही हल्लेखोरांना थांबवण्याचे धाडस दाखवला नाही. हल्लेखोर सूरज यांच्यावर कोयत्याने एवढा जबरदस्त प्रहार करत होते, त्या प्रहाराने सूरज पुलावरून खालच्या रस्त्यावर कोसळला. यामुळे तो जबर जखमी झाला. पण खाली पडल्यामुळे तो हल्लेखोराच्या तावडीतून वाचला. सार्वजनिक सुरक्षा उपायांची गरज – विजय कुंभार या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात हल्लेखोर सूरज काळे यांच्यावर कोयत्याने सपासप वार करताना दिसून येत आहेत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पुण्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. हिंसेच्या एका धक्कादायक घटनेत एका रिक्षाचालकावर हल्ला करण्यात आला. अशा घटनांवरून, अधिक कडक कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षा उपायांची किती निकड आहे, हे स्पष्ट होते. आरोपींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि पीडिताला त्वरित न्याय मिळायला हवा. पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तपासाची वेगवान चक्रे फिरवून तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Source link
ऑटोचालकावर कोयत्याने भयंकर हल्ला:राजमाता भुयारी मार्ग पुलावरील घटना; पुलावरून खाली पडला म्हणून वाचला, VIDEO