‘70 वर्षांत काय केले?’ असा प्रश्न आम्हाला वारंवार विचारला जातो. मात्र, याच काळात आम्ही शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, मराठी भाषा गावागावांत पोहोचवली आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. मग 12 वर्षांत मराठी शाळा बंद करण्याचे पाप कोणी केले, याचा
.
छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या. या वेळी माजी मंत्री राजेश टोपे यांचीही उपस्थिती होती. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सुळे यांनी शिक्षण, सामाजिक परिवर्तन, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि प्रताप पाटील यांना संधी देण्याबाबत भूमिका मांडली.
‘70 वर्षांत काहीच केले नाही, असे म्हणता; मग शिक्षणसंस्था कोणी उभारल्या?’
‘70 वर्षांत काय केले?’ हा प्रश्न विचारला जात असताना सुरुवातीला आपणही दबावाखाली आलो होतो. मागील पिढ्यांनी काहीच केले नाही, असे वारंवार सांगितल्यामुळे आत्मविश्वासावर परिणाम झाला; मात्र, आता या प्रश्नाचे उत्तर ठामपणे देण्याची वेळ आली आहे, असे सुळे म्हणाल्या.
गावागावांत मराठी भाषा पोहोचवणे, वाडी-वस्तीपर्यंत शिक्षण नेणे आणि सामान्य कुटुंबांतील मुलांना शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे, यासाठी अनेकांनी योगदान दिले. शैक्षणिक संस्था उभारल्यामुळेच आज ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विविध क्षेत्रांत पुढे जात आहेत, असे त्यांनी नमूद केले.
‘आम्ही संस्था उभ्या केल्या, मराठी भाषा रुजवली आणि अनेकांना शिक्षण दिले. मग 12 वर्षांत त्याच मराठी शाळा बंद करण्याचे पाप तुम्ही केले, त्याचाही हिशोब द्यायला तयार राहा,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.
लोकप्रतिनिधींनी 5 वर्षांच्या कामाचा हिशोब द्यावा
लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ सत्ता गाजवणारी व्यक्ती नव्हे, तर जनतेसाठी धोरणे तयार करणारा आणि बदल घडवणारा प्रतिनिधी असतो. त्यामुळे मतदारांनी आपल्या आमदार-खासदारांना त्यांनी 5 वर्षांत नेमके काय केले, कोणते धोरणात्मक बदल घडवले आणि जनतेच्या प्रश्नांसाठी किती प्रयत्न केले, हे विचारले पाहिजे, असे सुळे म्हणाल्या.
आपण विविध संयुक्त संसदीय समित्यांवर काम करत असून, त्या माध्यमातून महत्त्वाच्या धोरणांवर चर्चा होते. मात्र, लोकप्रतिनिधींना त्यांच्या धोरणात्मक कामाबाबत प्रश्न विचारण्याऐवजी वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारले जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
करदात्यांच्या पैशातून लोकप्रतिनिधींना वेतन आणि भत्ते मिळतात. त्यामुळे जनतेने त्यांच्याकडून कामाचा हिशोब मागणे आवश्यक आहे. ‘आम्ही कर भरतो, त्यातून तुम्हाला पगार मिळतो; मग 5 वर्षांत काय केले, याचे उत्तर द्या,’ असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षणामुळे शेतकरी कुटुंबातील मुली निर्णयक्षम
शिक्षणाचा सामाजिक परिवर्तनावर होणारा परिणाम स्पष्ट करताना सुळे यांनी शेतकरी कुटुंबातील एका मुलीचे उदाहरण दिले. शिक्षण घेऊन इंजिनिअर झालेल्या या मुलीने इंटरनेटच्या मदतीने ट्रॅक्टरची गुणवत्ता, किंमत, सवलती, डिलिव्हरी आणि हप्त्यांची माहिती तपासली. त्यानंतर तिच्या सल्ल्यानुसार कुटुंबाने ट्रॅक्टर खरेदीचा निर्णय घेतला.
पूर्वी घरातील निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग मर्यादित होता. मात्र, शिक्षणामुळे आज मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहत असून कुटुंबाच्या महत्त्वाच्या निर्णयांतही योगदान देत आहेत. हीच शिक्षणाची ताकद आहे, असे सुळे म्हणाल्या.
हुंडा आणि सामाजिक रूढींवर टीका
सामाजिक परिवर्तनासाठी केवळ महापुरुषांच्या विचारांवर भाषणे करून चालणार नाही, तर ते विचार कृतीत उतरवले पाहिजेत, असे सुळे यांनी सांगितले. हुंडाप्रथा आणि लग्नातील अवाजवी आर्थिक देवाणघेवाणीवर टीका करत त्यांनी समाजाने अशा प्रथा बंद करण्याचे आवाहन केले.
स्वतःच्या मुलीच्या लग्नात दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना आहेर किंवा भेटवस्तू न देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनीही आपल्या वैयक्तिक आयुष्यातून सामाजिक बदलाचे उदाहरण घालून द्यावे, असे त्या म्हणाल्या.
प्रताप पाटील यांना संधी देण्याचे आवाहन
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी प्रताप पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले. उमेदवार निवडताना त्याची निष्ठा, विचार, व्हिजन आणि काम करण्याची क्षमता तपासली पाहिजे. मतदारांनी यापूर्वी अनेकांना संधी दिली आहे; आता नव्या चेहऱ्याला संधी देऊन पाहावी, असे त्या म्हणाल्या.
शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणारा आणि त्यांच्या समस्यांसाठी विधानसभेत आवाज उठवणारा प्रतिनिधी निवडण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मतदारांनी उमेदवाराचा अभ्यास करून, विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन करत सुप्रिया सुळे यांनी भाषणाचा समारोप केला. कार्यक्रमात माजी मंत्री राजेश टोपे यांचाही सत्कार करण्यात आला.
हेही वाचा…
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांच्या पॅनलची आघाडी:हसन मुश्रीफ यांच्या महायुतीला धक्का, आघाडी सत्ता स्थापनेच्या दिशेने

कोल्हापुरातील प्रतिष्ठेची लढाई मानली जाणारी म्हणजे गोकुळ दूध उत्पादक संघाची निवडणूक. या निवडणुकीची राज्यभर चर्चा सुरू आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. या निवडणुकीचे मतदान पार पडले असून सध्या मतमोजणी सुरू आहे. याच मतमोजणीत आतापर्यंत सतेज पाटील यांचे पॅनल तब्बल 15 उमेदवार आघाडीवर आहेत. सविस्तर वाचा…