Headlines

पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग 12 तास लावणीचा धमाका:महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद




घुंगरांचा नाद, ढोलकीची थाप, लयबद्ध पदन्यास, लावणीतील नजाकत आणि रसिकांच्या ‘वन्स मोअर’च्या गजरात ३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात आयोजित सलग १२ तासांचा ‘लावणी महोत्सव’ श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे उत्साहात संपन्न झाला. दुपारी १२ ते रात्री १२ या वेळेत रंगलेल्या या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत लावणी कलावंतांनी आपल्या बहारदार नृत्याविष्काराने रसिकांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा जागर करणाऱ्या या महोत्सवाला लावणीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रेक्षागृह खचाखच भरले होते. उपस्थित रसिकांमध्ये महिलांची संख्याही मोठी होती. विक्रमी लावणी महोत्सवात रोशनी मुंबईकर, वृषाली सातपुते (ही बसली मनात), पूनम कुडाळकर, काव्य पुणेकर (तुमच्यासाठी कायपण), रेश्मा, वर्षा परितेकर, मृणाल शेळके (चाळ माझ्या पायात), शलाका पुणेकर, सोनाली शिंदे (कैरी मी पाडाची), कीर्ती देशमुख, सारिका नगरकर (नखरेली नारी) या नामवंत कलावंत सहकाऱ्यांसह सहभागी झाल्या होत्या. या सर्वांनी तब्बल १२ तास ठसकेबाज लावणी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. प्रारंभी महोत्सवात ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांना सर्व लावणी कलावंतांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लावणी कलेच्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने आणि कलाविष्काराने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या ज्येष्ठ कलावंतांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला. तसेच असा १२ तासांचा लावणी महोत्सव नवरात्रो महोत्सवात दरवर्षी आयोजित करणाऱ्या संयोजक अध्यक्ष आबा बागुल यांच्याबद्दलही सर्व लावणी कलावंतानी कृतज्ञता व्यक्त केली. ‘साठी बाजारी जाऊदे मला’,‘सांगा राया सांगा मी कशी दिसते’, ‘गेली कुठं गावाला’, ‘माझी म्हणू का’, ‘बायी गं तुटली माझी बांगडी’, ‘माझी मैना गावाकडे राहिली’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहार’,‘रात्र धुंदीत ही जागवा’, ‘पैलवान आला हो पैलवान आला’, ‘तुमच्या पुढ्यात कुटते मी’, ‘तुमच्यासाठी जीव झाला वेडा पिसा’, ‘आंबा तोतापुरी’, ‘नाद खुळा’, ‘या रावजी बसा भावजी’, ‘फड सांभाळ तुऱ्याला’, ‘होऊ द्या दमानं’, ‘येऊ कशी तशी नांदायला’, ‘मला म्हणत्यात हो पुण्याची मैना’ आणि ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’अशा अनेक लोकप्रिय लावण्यांनी रसिकांना ठेका धरायला लावला. ‘विचार काय आहे तुमचा पाहुणं’,‘मला वाटलं होतं तुम्ही याल’, ‘शिट्टी वाजली गाडी सुटली’ आणि ‘आजकाल पाटलाचा’या लावण्यांनाही रसिकांची दाद मिळाली. ‘चंद्रा’ चित्रपटातील ‘बान नजरेतला घेऊनि अवतरली चंद्रा’ तसेच ‘नटरंग’ चित्रपटातील ‘नटरंग उभा’ या लावण्यांच्या सादरीकरणाने रंगमंचावर विशेष रंगत आणली. पारंपरिक लावण्यांसोबत गवळणींच्या सादरीकरणानेही रसिकांना मंत्रमुग्ध केले.‘बुगडी माझी सांडली गं’ या लोकप्रिय लावणीला रसिकांनी ‘वन्स मोअर’ची दाद दिली. हावभाव, पदन्यास आणि ढोलकीच्या तालाचा सुरेख मेळ साधत नृत्यांगनांनी सलग १२ तास लावणी सादर करून रसिकांची मने जिंकली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *