![]()
हिंगोली जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पाणी, चारा, हमी योजनेच्या कामांच्या तक्रारीसाठी प्रशासनाने व्हॉटस्अप क्रमांक ८५४५०८८५४५ जारी केला असून या क्रमांकावर गावकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची तातडीने सोडवणूक केली जाणार आहे. टंचाई कालावधीत नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सोमवारी (ता. १९) दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. एल. गड्डापोड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, गटविकास अधिकारी माया वानखेडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. दुष्काळ निवारणासाठी गावपातळीवरील यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे, गावात दर बुधवारी ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कृषी विभागाचे प्रतिनिधी, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता, ग्रामसेवक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन पाणी व चारा उपलब्धता, जलस्रोतांची स्थिती आणि संभाव्य टंचाईचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जलसंधारणाची कामे प्रस्तावित करून निधी मागणी करावी. या कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच तालुक्यातील गायरान किंवा गाळपेरासाठी उपलब्ध असलेल्या मोकळ्या जमिनीची माहिती प्रशासनाला द्यावी, जेणेकरून उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून टंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना करता येतील, असेही त्यांनी सांगितले. पाणीटंचाई, चारा टंचाई तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांबाबत नागरिकांना काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या ८५४५०८८५४५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवावे. प्राप्त तक्रारींची दखल घेऊन त्यांचे निवारण करण्यात येणार असल्याचे यावेळी गुप्ता यांनी स्पष्ट केले. तर अधिकारी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरणार- विवेक गायकवाड, मुख्यकार्यकारी अधिकारी हिंगोली जिल्हयात तलावांच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. अवैधरित्या पाणी उपसा होऊ नये यासाठी क्षेत्रीयस्तरावर दक्षता घ्यावी. अवैध पाणी उपसा होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.
Source link
हिंगोली जिल्ह्यात व्हॉटस्अप क्रमांकावर करता येणार टंचाईच्या तक्रारी:प्रशासनाकडून क्रमांक जाहिर, टंचाई कालावधीत योग्य नियोजन करण्याच्या सूचना