![]()
“राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून गुन्हेगारांची हिंमत टोकाला पोहोचली आहे. मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार होतो, गुंड खुलेआम ऑडिओ-व्हिडिओ काढून जबाबदारी स्वीकारतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री 12 वाजता अभिनेत्याच्या घरी भेटायला जातात. मात्र, ठाण्यात स्वतःच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या होते, तेव्हा मुख्यमंत्री फिरकतही नाहीत. कारण काय, तर तो नगरसेवक दुसऱ्या पक्षाचा होता! सत्तेत असताना माणुसकी विसरून असा पक्षपाती भेदभाव करणे अत्यंत लज्जास्पद आहे. गृहखात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस नक्की काय करत आहेत? गृहमंत्रालय आणि पोलीस प्रशासन इतके लाचार व कमकुवत का झाले आहे?”, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी राज्यातील गुंडगिरी, जितेंद्र आव्हाडांना मिळालेली धमकी, सोलापूरमधील मायक्रो फायनान्सची बेकायदेशीर सावकारी, जलसंधारणातील 9,500 कोटींचा कथित कॅग घोटाळा, सीईटी परीक्षा गैरव्यवहार, शेतकऱ्यांची फसलेली कर्जमाफी आणि मराठी कंत्राटदारांची थकीत बिले यावर विस्तृत भाष्य करत महायुती सरकारवर कडाडून टीका केली.. मुंबईत पुन्हा गँगवॉरचे दिवस; गरिबांनी कसं जगायचं? राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रहार करताना रोहित पवार म्हणाले, “पूर्वी ज्या गँगवॉरवर चित्रपट बनायचे, तशीच भीषण परिस्थिती आज मुंबईत निर्माण झाली आहे. टायगर श्रॉफवर गोळीबार करून सोशल मीडियावर थेट जबाबदारी घेतली जाते, यावरून गुंडांना पोलिसांचा धाक उरलेला नाही हे स्पष्ट होते. गृहखाते कमकुवत झाल्यामुळेच अशा टोळ्यांना बळ मिळत आहे.” जितेंद्र आव्हाडांच्या घरापर्यंत पोहोचले गुंड “काल रात्री आमदार जितेंद्र आव्हाड यांना थेट फोनवर धमक्या दिल्या गेल्या आणि एक व्यक्ती त्यांच्या घराच्या दरवाजापर्यंत पोहोचून धमकी देऊन गेली. जर लोकप्रतिनिधी, आमदार आणि अभिनेतेच सुरक्षित नसतील, तर सामान्य माणसाने स्वतःच्या घरात दार लावून बसायचे का? आम्हाला स्वतःच्या सुरक्षेसाठी खाजगी बाउन्सर ठेवावे लागतात; कारण पोलिसांवर विसंबून राहता येत नाही. हे सरकार गरिबांचे नसून फक्त गुंडांचे आणि ठराविक उद्योगपतींचे आहे.” सोलापुरात मायक्रो फायनान्सचा बळी “सोलापूर शहरात मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही आधुनिक सावकारी असून गरिबांचा छळ सुरू आहे; मात्र सरकारमधील एकही मंत्री किंवा नेता पीडित कुटुंबाचे सांत्वन करायला गेलेला नाही.” पाण्यात 9,500 कोटींचा भ्रष्टाचार जलसंधारण आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला घेरले. “2014 ते 2019 दरम्यानच्या काळात तत्कालीन जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या खात्यात साडे नऊ हजार कोटी (9,500 कोटी) रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे कॅगच्या (CAG) अहवालात समोर आले आहे. जलसंधारणाच्या नावाखाली केवळ खोदकाम झाले, पाण्याचा थेंबही अडवला गेला नाही; मात्र कंत्राटदार आणि कार्यकर्त्यांची घरे मात्र मोठी झाली.” सीईटी घोटाळ्याचे बारशी कनेक्शन “काही दिवसांपूर्वी आम्ही सीईटी परीक्षेतील गैरव्यवहाराचा मुद्दा लावून धरला होता. या सीईटी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे थेट बारशीपर्यंत पोहोचले आहेत. या गैरव्यवहारात कोण जबाबदार नेते आहेत, त्यांची नावे आम्ही लवकरच पुराव्यानिशी जाहीर करू.” कर्जमाफीचा गाजावाजा, प्रत्यक्षात 42 लाख शेतकरी वाऱ्यावर! शेतकरी कर्जमाफीच्या सरकारी दाव्यांची पोलखोल करताना ते म्हणाले, “शासनाने 55 लाख शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र, जाचक अटींमुळे प्रत्यक्षात केवळ 13 लाख शेतकऱ्यांना 12,000 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. 55 लाखांपैकी फक्त 24 लाख शेतकऱ्यांची नावे यादीत आली असून उर्वरित तब्बल 42 लाख शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहेत. सरकार केवळ ‘सकारात्मक आहोत’ असे सांगून वेळकाढूपणा करत आहे.” सोलापूर आरटीओत महिन्याला 10 ते 15 कोटींची वसुली “सोलापूर जिल्ह्यात आरटीओ विभागाकडून शेतकरी आणि छोट्या वाहनचालकांना अडवून महिन्याला 10 ते 15 कोटी रुपयांची अवैध वसुली केली जात आहे. या वसुलीचे सूत्रधार कोण आहेत, हे संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे.” मराठी कंत्राटदारांचे 90,000 कोटी अडकवले राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि स्थानिक ठेकेदारांच्या प्रश्नावर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. “सार्वजनिक बांधकाम विभागाकडे स्थानिक मराठी कंत्राटदारांची तब्बल 86,000 ते 90,000 कोटी रुपयांची बिले थकलेली आहेत. गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या मोठ्या कंत्राटदारांना वेळेवर बिले दिली जातात; मात्र महाराष्ट्रातील 60 ते 70 हजार मराठी कंत्राटदारांना भीक मागावी लागत आहे.” 10 लाख कुटुंबांवर उपासमारीची वेळ “या कंत्राटदारांवर राज्यातील 7 ते 8 लाख कामगार, अभियंते, तसेच सिमेंट, वाळू आणि वाहतूकदार अवलंबून आहेत. जर शासनाने ही बिले तात्काळ मंजूर केली नाहीत, तर आगामी अधिवेशनापूर्वी संपूर्ण राज्यात कंत्राटदारांचा तीव्र एल्गार पाहायला मिळेल,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला. शिक्षक निवडणुकीत महायुतीचे दोन उमेदवार पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या बंडखोरीवर त्यांनी जोरदार चिमटा काढला. “पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचा एक उमेदवार आणि शिंदे गटाचा एक उमेदवार रिंगणात आहे. त्यांच्यात एवढा गोंधळ आहे की, त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मीडियासमोर एकमेकांचे केस उपटावेत. महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर आणि इतर उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.” पुण्यात पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत, “पत्रकारांना किंवा राजकीय व्यक्तींना अशा प्रकारे सोशल मीडियावर खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल करणे अत्यंत चुकीचे असून हे प्रकार तात्काळ थांबले पाहिजेत,” असे आवाहन त्यांनी शेवटी केले. ————————————————————————————- हेही वाचा… परदेशात बसून मुंबईत दहशत माजवणाऱ्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ ठेचणार: उद्योगपतींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवणाऱ्यांनी आम्हाला कायदा शिकवू नये; योगेश कदम यांचा संजय राऊतांवर पलटवार
“मुंबई आणि महाराष्ट्रावर सिनेक्षेत्रातील कलाकारांचा, दिग्दर्शकांचा आणि तंत्रज्ञांचा मोठा विश्वास आहे. हा विश्वास मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आधारलेला आहे. परदेशात बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या देणे किंवा शूटर पाठवून गोळीबार करून दहशत निर्माण करणे, ही विशिष्ट टोळ्यांची कार्यपद्धती पोलिसांना पूर्णपणे ठाऊक आहे. अशी गुंडगिरी आमचे सरकार अजिबात सहन करणार नाही. परदेशातून सुरू असलेले हे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेट मोडून काढण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारची मदत घेत असून, संबंधित दोषींवर 100% कठोर कारवाई केली जाईल. कलाकारांसह कोणत्याही नागरिकाने घाबरण्याचे कारण नाही; प्रत्येकाच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सरकार आणि पोलिसांची आहे,” अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
महाराष्ट्रात गृहमंत्रालय एवढं लाचार का? रोहित पवारांची टीका:म्हणाले- अभिनेत्यासाठी मुख्यमंत्री रात्री 12 वाजता धावतात, पण नगरसेवकाची हत्या झाल्यावर फिरकतही नाहीत!