Headlines

भाकपकडून निकृष्ट धान्य पुरवठ्याचा तीव्र निषेध:तिवसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर




सरकारी स्वस्त धान्य दुकानांतून नागरिकांना पुरवण्यात आलेले धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खाण्यायोग्य धान्य मिळावा, या मागणीसाठी पक्षाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. भाकपचे तिवसा तालुका सचिव कॉ. प्रकाश सोनोने यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. केंद्र आणि राज्य सरकार गरीब व निराधार जनतेला अन्न मिळावे, या उदात्त हेतूने प्रतिमानसी प्रतिमाह तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू पुरवते. सध्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी वितरित करण्यात आले आहे. मात्र, यावेळचे गहू-तांदूळ खाण्यायोग्य नसल्याने भाकपने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, हे धान्य इतके खराब दर्जाचे आहे की ते लाभार्थ्यांना आहारात घेणे अत्यंत कठीण झाले आहे. गहू खाण्यास योग्य नसून, तांदळात बारीक चुरी आणि भुकटी मिसळलेली आहे. या निकृष्ट धान्य पुरवठ्यामागे पुरवठा करणारा ठेकेदार आणि त्यावर नियंत्रण ठेवणारे पुरवठा अधिकारी यांची मिलीभगत असल्याचे भाकपने म्हटले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करून सुधारित धान्य पुरवले जावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय, गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये होत असलेली वाढ आणि त्यांची चणचण याचाही निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनात राजाभाऊ बाभुळकर, दिलीप गोहत्रे, देवेंद्र बावणे, श्रीकृष्ण लांजेवार, अनिकेत खुळे, जितेंद्र कोरडे, सुरेश कळसकर, नवाज पठाण, सदाशिव महिंगे, सुनील मुळे, नितीन काळकर, गणेश ठोंबरे, आरूफ जमीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *