![]()
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. नियमांचे प्रामाणिकपणे पालन करणाऱ्या व्यावसायिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न तसेच गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे मुंढे म्हणाले. पुण्यात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत मुंढे यांनी अन्नभेसळ, प्रतिबंधित गुटखा विक्री, दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता आणि औषधांच्या बेकायदा विक्रीसंदर्भात प्रशासनाची भूमिका मांडली. अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री करणाऱ्या प्रत्येक आस्थापनाने स्वच्छता आणि गुणवत्ताविषयक नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे, असे त्यांनी सांगितले. ही कारवाई कोणाला त्रास देण्यासाठी नसून सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. प्रशासनाकडून दूध संकलन केंद्रांपासून प्रक्रिया उद्योग, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांपर्यंत संपूर्ण पुरवठा साखळीची तपासणी केली जात आहे. पनीर, खवा, लोणी, तूप, चीज आणि आइस्क्रीमसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. याशिवाय, शाळांमधील कँटीन, उपहारगृहे आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची तपासणी करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. पुणे विभागात राबविण्यात आलेल्या मोहिमेत लाखो रुपयांचा संशयित आणि नियमबाह्य अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहात स्वच्छता, अन्नसाठवणूक आणि तापमान नियंत्रणातील त्रुटी आढळल्यानंतर परवाना निलंबित करण्यात आला होता. प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या उत्पादन, वाहतूक, साठवणूक व विक्रीविरुद्धही प्रशासनाची कठोर भूमिका कायम राहणार आहे. नागरिकांनी भेसळयुक्त किंवा निकृष्ट अन्नपदार्थांबाबत प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन मुंढे यांनी केले. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि व्यावसायिकांची नियमपालनाची जबाबदारी यामुळेच ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे, सुरक्षित महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट साध्य होईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
Source link
भेसळखोरांवर कारवाई सुरूच राहणार:नियम पाळणाऱ्यांनी घाबरू नये; अन्न व प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे