Headlines

भोंदू बागेश्वर मनुस्मृतीचेच आधुनिक व्हर्जन:त्याने स्वतःपासूनच 4 मुले जन्माला घालण्याची सुरुवात करावी, रोहित पवार यांचा टोला




नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या काही विधानांमुळे नवा वाद निर्माण झाला असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शास्त्री यांनी हिंदू समुदायाला आवाहन करताना “चार मुले जन्माला घाला आणि त्यातील एक अपत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या,” असे विधान केले. या विधानावरून विरोधकांनी टीका केली आहे. भोंदूला एवढीच काळजी आहे तर त्याने मुले जन्माला घालण्याची सुरवात स्वतःपासून करावी, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, “चार मुलं जन्माला घालून एक मुल संघाला द्या”, हे भोंदू बागेश्वर बाबाचे वाक्य मनुवादी पुरुषी मानसिकतेचेच लक्षण आहे. या मानसिकतेने मनुस्मृतीच्या माध्यमातून महिलांना क्रोधी, दुष्ट आणि विश्वासघातकी म्हणून हिणवले असून महिलांना कायम दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केला आणि यांच्या विचारसरणीतही महिलांना कोणतेही स्थान नाही, हेच स्पष्ट केले. यासाठीच तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. पुढे रोहित पवार म्हणतात, महिलांना केवळ मुले जन्माला घालण्याचे मशीन समजून त्यांना चूल आणि मुलापुरतंच मर्यादीत करु पाहणारा हा भोंदू बागेश्वर बाबा एकप्रकारे मनुस्मृतीचंच आधुनिक व्हर्जन आहे. राजकीय व्यासपीठावर हा भोंदू असली वक्तव्ये करत असेल तर हेच का यांचे नारीशक्ती वंदन? या भोंदूला एवढीच काळजी आहे तर त्याने मुले जन्माला घालण्याची सुरवात स्वतःपासून करावी आणि भाजपा नेत्यांसाठीही हाच सल्ला अनिवार्य करावा. या भोंदूला काही नेते संत म्हणत असतील तर महाराष्ट्राचे याहून मोठे वैचारिक अधःपतन ते कोणते, अशी खंत पवारांनी व्यक्त केली आहे. बागेश्वर बाबांनी पहिले स्वत: मुले जन्माला घालावी- संजय राऊत दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, बागेश्वर बाबा यांचे वय काय? अभ्यास काय? ते म्हणतात 4 मुलं जन्माला घाला? त्यांनी लोकांना सल्ला देण्यापूर्वी स्वत: मुले जन्माला घालावी. तुम्ही ब्रह्मचारी अजून तुमचे लग्न झाले नाही आणि दुसऱ्यांना सांगत आहात 4 मुले जन्माला घाला आणि 1 मुल संघाला द्या. तुम्ही स्वत:पासून सुरवात केली पाहिजे. हे काय हिंदूत्व नाही. भाजप जो प्रचार करतंय ते काही हिंदूत्व नाही. त्यांचा प्रचार खरात बाबा सारखे लोकं करतात. एकीकडे लोकसंख्या नियंत्रीत ठेवा म्हणतात आणि दुसरीकडे अशा माध्यमातून लोकसंख्या वाढवण्याचा प्रचार करताय का? सैन्यासाठी एक मुलं द्या म्हटले असते तर आम्ही त्यांचे स्वागत केले असते, असे राऊत म्हणाले. इंग्रजीच्या पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला तर दुसरीकडे एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातून मराठ्यांच्या इतिहासाचा नकाशा काढून टाकण्यात आल्याचे समोर आले असून यावर देखील रोहित पवारांनी ट्विट करत टीका केली आहे. ते म्हणाले, राज्य सरकारला न जुमानता ‘एनसीईआरटी’ने इयत्ता 8 वीच्या हिंदीच्या पुस्तकानंतर आता इंग्रजीच्या पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. शिंदे, होळकर, पेशवे, भोसले आणि बारा बलुतेदार व अठरापगड जातीतील मावळ्यांनी अटकेपार झेंडे रोवले, हा मराठ्यांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा इतिहास पुसून टाकण्याचा डाव दिसतो. खऱ्या इतिहासाची तोडफोड करुन सोयीचा इतिहास पुढे आणण्याचा सपाटा काही घटकांकडून लावला जात असताना नकाशा हटवण्याचा निर्णय म्हणजे त्याच पठडीतला आणि महाराष्ट्र द्वेषाचा एक नमुना आहे. राज्य सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करुन अशा प्रकारे एकतर्फी नकाशा हटवण्याच्या ‘एनसीईआरटी’च्या निर्णयाला तीव्र आक्षेप नोंदवावा. अन्यथा सरकारला महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेच्या संतापाचा सामना करावा लागेल, हे निश्चित, असा इशारा पवारांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *