![]()
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. इंदापूर तालुक्यातील रूई गावात श्री बाबीर देवस्थान मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यादरम्यान भाषण करताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना त्यांना ‘दिवंगत’ म्हटले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती होती. भरणे यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ कुजबुज सुरू झाली. रूई गावातील धार्मिक कार्यक्रमात भरणे भाषण करत होते. भाषणादरम्यान बोलण्याच्या ओघात त्यांच्या तोंडून उद्धव ठाकरे यांच्याबाबत हे वक्तव्य झाले. आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच त्याच व्यासपीठावरून याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे वक्तव्यापेक्षा त्यानंतरची माफी आणि भरणे यांच्या भाषणशैलीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भरणे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबाबत त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे याआधीही त्यांच्या एका वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबाबत वाद निर्माण झाला होता. 2021 मध्येही उद्धव ठाकरेंबाबत केले होते वक्तव्य 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात दत्तात्रय भरणे राज्यमंत्री होते. त्यावेळी सोलापूर शहरातील एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना, “मुख्यमंत्री जाऊ द्या, मरू द्या… मी तुम्हाला निधी देतो” असे वक्तव्य केले होते. त्या काळात उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. भरणे यांच्या या वक्तव्यावरून त्यावेळी मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. मुख्यमंत्र्यांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसल्याची टीका त्यांच्यावर झाली होती. वाद वाढल्यानंतर भरणे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. बोलण्याच्या ओघात चुकीचा शब्द निघाला असून कोणाचाही अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता, असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. पुन्हा माफी मागण्याची वेळ का आली? आता काही वर्षांनंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना भरणे यांच्या तोंडून चुकीचा उल्लेख झाला आणि त्यानंतर त्यांना व्यासपीठावरूनच दिलगिरी व्यक्त करावी लागली. त्यामुळे ‘बोलण्याच्या ओघात चूक झाली’ हा खुलासा वारंवार का करावा लागतो? असा सवाल उपस्थित होत आहे. मंत्रीपदासारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीच्या प्रत्येक वक्तव्याकडे गांभीर्याने पाहिले जाते. सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना शब्दांची निवड आणि वक्तव्याचा संदर्भ याची काळजी घेणे अपेक्षित असते. त्यामुळे एखादी चूक झाल्यानंतर माफी मागणे ही निश्चितच चांगली बाब आहे; मात्र अशा प्रकारच्या चुका वारंवार होत असतील तर त्यावर प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. भरणेंच्या वक्तव्याची पुन्हा राजकीय चर्चा रूई येथील कार्यक्रमातील ताज्या वक्तव्यामुळे दत्तात्रय भरणे पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. एका बाजूला त्यांनी चूक लक्षात येताच माफी मागितली, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या पूर्वीच्या वक्तव्याची आठवणही करून दिली जात आहे. त्यामुळे भरणे यांच्या भाषणात वारंवार असे शब्दांचे घोळ का होतात आणि त्यानंतर माफी मागण्याची वेळ का येते? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. आगामी काळात या वक्तव्यावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडेही लक्ष लागले आहे. हेही वाचा.. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात मोर्चाची परवानगी नाकारली:जरांगे पटील म्हणाले- जेलमध्ये टाकले तरी आता माघार नाही, 15 सप्टेंबरला मराठे मुंबईत धडकणारच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 15 सप्टेंबरपासून ‘मुंबई चलो’ आंदोलनाची हाक देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सरकारला गोरगरिबांची अजिबात कदर नाही. आम्ही सरकारला तब्बल 3 वर्षे संधी दिली. आता काय व्हायचे ते मुंबईतच होणार, आम्हाला जेलमध्ये टाकले तरी चालेल, पण हे आंदोलन आता थांबणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. सविस्तर वाचा..
Source link
मंत्री दत्तात्रय भरणेंचं उद्धव ठाकरेंबद्दल पुन्हा वादग्रस्त विधान:चूक लक्षात येताच मागितली माफी, 2021 च्या वक्तव्याचीही आठवण