![]()
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महापालिकेच्या इमारतीबाबत केलेल्या एका अजब आणि खळबळजनक विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. “ज्या जागेवर महापालिकेची इमारत उभी आहे, तिथे पूर्वी मुडदे गाढले जायचे. हा कब्रस्तानचा भाग असल्याने तिथे आत्मे फिरतात आणि त्यामुळेच तुम्ही बेचैन होता,” असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी यांनी केले आहे. या विधानामुळे आता अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. महापालिकेने खरेदी केलेल्या नव्या अग्निशामक दलाच्या गाडीच लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजूरकर, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा मुख्यालयात याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना शिरसाट यांनी प्रशासकीय इमारतीवर भाष्य करताना उपरोक्त विधान केले. नेमके काय म्हणाले संजय शिरसाट? संजय शिरसाट म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर महापालिकेला सध्या ग्रहण लागलं आहे. याचं कारण म्हणजे ही इमारत ज्या जागेवर उभी आहे, तिथं एकेकाळी मुडदे गाढले जायचे. हा कब्रस्तानचा भाग आहे. इथले आत्मे तुम्हाला दिसतात आणि त्यामुळेच तुम्ही सर्व बेचैन होता. जर यातून मुक्ती हवी असेल, तर ही इमारत एखाद्या चांगल्या ठिकाणी हलवा. आत्म्यालाही सुटका मिळेल अन् तुम्हालाही! संजय शिरसाट यांनी केवळ आत्म्यांचा उल्लेख करून थांबले नाहीत, तर त्यांनी इमारत स्थलांतरित करण्याचा सल्लाही दिला. “शहर चांगलं करायचं असेल, तर महापालिका प्रशासनाने नव्या जागेचा विचार करावा. यामुळे भटकणाऱ्या आत्म्यांनाही शांती मिळेल आणि काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही या त्रासातून सुटका होईल,” असेही त्यांनी नमूद केले. वाद निर्माण होण्याची शक्यता एका जबाबदार पदावर असलेल्या पालकमंत्र्यांनी अशा प्रकारे ‘आत्मे’ आणि ‘मुडदे’ यांचा संदर्भ देऊन महापालिकेच्या कामात येणाऱ्या अडचणींचे खापर जागेवर फोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विरोधकांकडून या विधानाचा समाचार घेतला जाण्याची शक्यता असून, विकासकामांच्या चर्चेऐवजी आता ‘भूत-खेतांच्या’ चर्चेला उधाण आले आहे. मनपाला १२ मजल्यांपर्यंत आग विझवणारे मिळाले वाहन दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात १५.७८ कोटी रुपयांचा अत्याधुनिक ‘मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर’ दाखल झाला आहे. या ३६ मीटर उंचीच्या यंत्रणेमुळे आता १२ व्या मजल्यापर्यंत लागलेली आग जमिनीवरूनच विझवणे शक्य होणार आहे. शहरातील वाढत्या बहुमजली इमारतींच्या सुरक्षिततेसाठी हे वाहन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेले हे वाहन जर्मनीच्या ‘स्विंग’ कंपनीने तयार केले आहे. या यंत्रणेत ३६ मीटर उंचीचा वॉटर टॉवर, १४,००० लिटर क्षमतेचा वॉटर बाउजर आणि एक विशेष रोबोट यांचा समावेश आहे. यामुळे १० ते १२ मजली इमारतींमध्ये लागलेल्या आगीवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येईल. लवकरच संबंधित कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिल्यानंतर ही मशीनरी प्रत्यक्ष सेवेत रुजू केली जाईल, ज्यामुळे शहरातील आपत्कालीन सेवा अधिक सक्षम होतील. टॉवरच्या बूमवर बसवलेल्या थर्मल आणि मॉनिटरिंग कॅमेऱ्यामुळे ऑपरेटरला जमिनीवरूनच आगीचे अचूक ठिकाण शोधून पाण्याचा मारा करणे शक्य होईल. तसेच, आगीच्या ठिकाणी मानवी प्रवेश धोक्याचा असल्यास, अग्निशमन रोबोट आत जाऊन आग विझवण्यास सक्षम आहे. यामुळे अग्निशमन जवानांना आगीच्या अगदी जवळ जाण्याचा धोका पत्करावा लागणार नाही, ज्यामुळे त्यांची सुरक्षा सुनिश्चित होईल.
Source link
महापालिकेत आत्मे दिसतात, तिथे मुडदे गाढले जायचे:पालिकेचे ग्रहण सुटण्यासाठी इमारत बदला, मंत्री संजय शिरसाट यांचे अजब विधान