![]()
महिला आरक्षण विधेयक संमत न झाल्याच्या निषेधार्थ आज वरळीत महायुतीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र, या मोर्चात एक वेगळाच पेच पाहायला मिळाला. मोर्चामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत तासाभरापासून अडकलेल्या एका सामान्य महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. “लोकांना वेठीस धरून रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा बाजूच्या मैदानात जा,” अशा शब्दांत या महिलेने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याने मोर्च्याच्या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर न झाल्याने महायुतीच्या महिला आघाडीने काँग्रेससह इतर विरोधी पक्षांविरोधात आज (२१ एप्रिल) वरळीत मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, या मोर्चामुळे दुपारच्या सुमारास वरळी आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. दुपारी १ च्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिक हैराण झाले होते. लोकांना त्रास देणारे हे कसले आंदोलन? याच कोंडीत अडकलेल्या एका महिलेचा संताप अनावर झाला. ती आपल्या कारमधून खाली उतरली आणि थेट मोर्चाच्या ठिकाणी पोहोचली. तिथे उपस्थित महिलांना आणि पोलिसांना जाब विचारत तिने गोंधळ घातला. “एका तासापासून मी इथे अडकले आहे. लोकांच्या कामाला आणि मुलांच्या शाळेला अडथळा निर्माण करून हे कसले आंदोलन?” असा सवाल करत तिने आंदोलनकर्त्यांना सुनावले. मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर संताप या मोर्चामध्ये भाजपचे संकटमोचक समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे सहभागी झाल्या होत्या. संबंधित महिलेने थेट त्यांच्यासमोर जाऊन वाहतूक कोंडीचा पाढा वाचला. “आम्हाला त्रास देऊ नका, आंदोलन करायचे असेल तर मैदानात करा.” महिलेने सांगूनही कुणी ऐकत नसल्याचे पाहून ‘तुम्हाला समजत नाहीये का?’ असा सवाल गिरीश महाजन यांना केला. यावेळी तिने पोलिसांनाही रस्ता रिकामा करण्यासाठी धारेवर धरले. पोलिसांना परिस्थिती हाताळताना मोठी कसरत करावी लागली. रोहित पवारांची सरकारवर टीका या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “अनेक लोकांना आरोग्याच्या अडचणी असतात आणि अशा परिस्थितीत केवळ केंद्रातून आदेश आले म्हणून आणि His Masters Voice ला खूष करण्याच्या प्रयत्नात एखादा पक्ष लोकांना तीन-तीन तास ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवत असेल तर त्याची जोरदार रिॲक्शन मिळणारंच.. अशाच एका संतप्त महिलेचा मुंबईतील व्हिडिओ बघायला मिळाला. आंदोलनाचं कारण सत्य असेल तर लोकं समजून घेतात… पण खोट्यासाठी लोकांना वेठीस धरलं जात असेल तर लोक तोंडावर कशी फजिती करतात, हेच या व्हिडिओतून दिसतं. आता त्रस्त व्यक्ती रागावल्याने काही वेळा शब्द चुकीचे जाऊ शकतात पण म्हणून संबंधित लाडक्या बहिणीवर कारवाई न करता तिच्या भावना समजून घेऊन तिला त्रास देणाऱ्यांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे…!.” असेही रोहित पवार म्हणालेत.
Source link
महायुतीच्या मोर्चामुळे वरळीत वाहतूक कोंडी:संतप्त महिलेने गिरीश महाजनांनाच झापले, मैदानात जाऊन आंदोलन करा म्हणत संताप व्यक्त