Headlines

मित्राच्या कन्येच्या लग्नाला दिली आर्थिक मदत:”अगस्ति”च्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम; मैत्रीसोबत सामाजिक बांधिलकीही जपली‎



शालेय जीवनातील आठवणी केवळ अल्बममध्ये कैद न ठेवता, एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा एक वस्तुपाठ अकोले तालुक्यातील ‘ऋणानुबंध मैत्री बचत गटा’ने घालून दिला आहे. आपल्याच एका मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी या गटाने ३० हजार रुपयांची आर्थिक मदत द

.

अगस्ती विद्यालयातील १९९७-९८ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘ऋणानुबंध मैत्री बचत गट’ स्थापन केला आहे. नुकतीच या गटाने आपली तिसरी मदत म्हणून सदस्य धोंडू तुकाराम बेनके यांची कन्या दिव्या हिच्या विवाहानिमित्त ३० हजार रुपयांची आपुलकीची भेट दिली. या कृतीतून ‘मैत्री म्हणजे केवळ गप्पा नव्हे, तर एकमेकांची जबाबदारी’ असल्याचे या मित्रांनी सिद्ध केले.

या गटाची कार्यपद्धती वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. या गटातील प्रत्येक सदस्य स्वतःचा वाढदिवस बडेजाव न करता साधेपणाने साजरा करतो. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून प्रत्येक सदस्य १ हजार रुपये बचत गटात जमा करतो. हा जमा झालेला निधी केवळ विवाहासाठीच नाही, तर सदस्यांच्या कुटुंबातील वैद्यकीय अडचणी किंवा मुलांच्या शिक्षणासाठीही वापरला जातो.

गटाचे अध्यक्ष रामदास बेनके हे आहेत. सचिव राम कोतवाल यांच्यासह अमजद शेख, प्रा. आशिष तळेकर, नंदू मंडलिक, भिवा सदगीर, अरुण बेनके यांसह सर्व माजी विद्यार्थी या उपक्रमात हिरिरीने सहभागी होत आहेत. ऋणानुबंध मैत्री बचत गटाच्या या उपक्रमाचे समशेरपूर परिसरातून आणि विशेषकरून शिक्षकवर्गातून कौतुक होत आहे. मैत्री म्हणजे फक्त गप्पा-टप्पा नसून, ती जबाबदारी आणि विश्वासाचे नाते आहे, हे या ऋणानुबंध मैत्री बचत गटातील मित्रमंडळींनी कृतीतून दाखवून दिले. वाढदिवसाच्या खर्चाला कात्री लावून सामाजिक कार्यासाठी निधी उभारण्याची त्यांची कल्पना आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *