![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांतील प्रवास केवळ ४८ मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतील. तसेच, महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे महत्त्वाचे केंद्र बनवण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे. हा संकल्प साकार करण्यासाठी जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडले जाईल. यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्च ७ ते ८ टक्क्यांपर्यंत कमी होऊन महाराष्ट्र जागतिक पुरवठा साखळीतील प्रभावी केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जबिल कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, आमदार दिलीप वळसे पाटील, जॅबिलचे कार्यकारी उपाध्यक्ष अँडी प्रिस्टली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र देशातील डेटा सेंटर हब म्हणून उदयास येत आहे, ज्यात भारतातील सुमारे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता राज्यात विकसित होत आहे. डेटा सेंटर, डीप टेक, इलेक्ट्रॉनिक्स आणि चिप उत्पादनाशी संबंधित संपूर्ण उद्योग परिसंस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत महाराष्ट्राने अग्रस्थान मिळवले असून, केंद्र सरकारने दिलेल्या इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरमुळे उद्योगाला नवी गती मिळेल. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर जेएनपीटी आणि वाढवण बंदराला समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मांडला. हा कॉरिडॉर जालना, वर्धा येथील ड्राय पोर्ट आणि पुढे गडचिरोलीपर्यंत जोडला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा सुमारे १४ टक्के वाटा असून, निर्यातीत हा वाटा २० टक्क्यांपर्यंत आहे. जबिलच्या या अत्याधुनिक प्रकल्पातील अचूकता, प्रगत तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नवकल्पना भारतातील उत्पादन क्षेत्राच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. भारत आज इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्यातीमध्ये मोठी झेप घेत आहे. मोबाईल उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्यानंतर आता सेमीकंडक्टर आणि चिप निर्मिती क्षेत्रातही देशाने भक्कम पाऊल टाकले आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
Source link
मुंबई-पुणे बुलेट ट्रेनने प्रवास 48 मिनिटांत:महाराष्ट्र जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस