Headlines

मुंबई-बंगळुरू आता अवघ्या साडेपाच तासांत:गडकरींच्या घोषणेमुळे महाराष्ट्राला मोठा फायदा; पुणे ते संभाजीनगर मार्गालाही मंजुरी




मुंबई ते बंगळुरू हा प्रवास आता अवघ्या साडेपाच तासांत पूर्ण करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी नव्या महामार्गाबाबत घोषणा केली. या मार्गाच्या पहिल्या टप्प्याची निविदा काढण्यात आली असून, पुण्यापर्यंतचे काम तीन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. पुढे हा मार्ग फलटणमार्गे थेट बंगळुरूपर्यंत जोडला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नितीन गडकरी यांनी सांगितले की, हा महामार्ग मुंबईतील अटल सेतूनंतर सुमारे चार किलोमीटर अंतरावरून सुरू होणार आहे. आतापर्यंत उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर किंवा सोलापूर हा मुख्य मार्ग होता. मात्र आता वाहतुकीचा मोठा भाग सुरतमार्गे नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, कर्नूल, चेन्नई, बंगळुरू, मंगळुरू आणि हैदराबादकडे वळवण्यात येणार आहे. या नव्या रस्तेमार्गामुळे चेन्नई ते दिल्लीचे अंतर 320 किलोमीटरने कमी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच बंगळुरू आणि चेन्नईकडील मोठी वाहतूक सुरतमार्गे वळवल्याने सोलापूर परिसरातील वाहतुकीचा ताण 40 ते 50 टक्क्यांनी कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय पुणे ते छत्रपती संभाजीनगर या मार्गालाही मंजुरी मिळाल्याचे गडकरी यांनी जाहीर केले. भविष्यात पुणे ते नागपूर हा प्रवास अवघ्या साडेचार तासांत पूर्ण करता यावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. पालखी मार्गामुळे या परिसरातील औद्योगिक आणि व्यापारी विकासाला गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले. कंटेनर वाहतूक वाढल्याने गोदामे, लॉजिस्टिक पार्क आणि उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबई विमानतळासाठी जसे आधीच उड्डाणपूल आणि रस्त्यांचे नियोजन करण्यात आले, त्याच धर्तीवर पुरंदर विमानतळासाठीही नियोजन करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टोल व्यवस्थेबाबतही नितीन गडकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली. देशातील टोलनाक्यांवरील बॅरिअर हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता वाहन क्रमांक आणि फास्टॅगच्या आधारे थेट बँक खात्यातून टोल वसूल केला जाणार आहे. यामुळे वाहनधारकांचा वेळ वाचेल आणि वाहतूक कोंडी कमी होईल, असे त्यांनी सांगितले. कारचालकांसाठी तीन हजार रुपयांचा वार्षिक पास देण्यात आल्याची माहिती देताना त्यांनी आर्थिक दिलासा मिळेल, असे नमूद केले. मात्र कोणालाही पूर्ण टोलमाफी देणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अनेक नव्या प्रकल्पांची घोषणा दरम्यान, राज्यातील विविध भागांसाठी अनेक नव्या प्रकल्पांची घोषणाही करण्यात आली. जेजुरी येथे दोन किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. फलटण शहरातील रस्ते रुंदीकरणासाठी 97 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. नीरा रस्त्यावर 72 मीटर लांबीचा रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्यात येणार आहे. तसेच टेंभुर्णी ते पंढरपूर दरम्यान साडेनऊ किलोमीटर लांबीचा बाह्यवळण मार्ग तयार केला जाणार असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंढरपूरला पूर्ण रिंगरोडची सुविधा मिळणार आहे. तोंडले गावात दोन्ही पालखी मार्ग जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी 100 कोटी रुपयांच्या खर्चातून उड्डाणपूल उभारण्याची घोषणाही गडकरी यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *