Headlines

मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण 2 महिन्यात हटवा:विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आदेश, हिंगोलीत घेतली यंत्रणांची बैठक




हिंगोली जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण दोन महिन्यात हटविण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी गुरुवारी ता. २३ सायंकाळी जिल्ह्यातील आढावा बैठकीत दिले आहेत. यावेळी त्यांनी जिल्ह्यातून होणारी वाळू चोरी खपवून घेतली जाणार नाही. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, विभागीय उपायुक्त दादासाहेब वानखेडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, मंजूषा मुथा, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, समाधान घुटुकडे, विकास माने यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी हिंगोली जिल्ह्याच्या कामाचा आढावा दिला. तसेच औंढा नागनाथ तिर्थक्षेत्र विकास कामांची माहिती दिली. जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या भूकंपाबाबत केल्या जाणाऱ्या जनजागृती बाबतही त्यांनी माहिती दिली. यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग व इतर महामार्गाच्या बाजूला झालेले अतिक्रमण पुढील दोन महिन्यात हटविण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यासाठी इतर यंत्रणांची मदत घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. हिंगोली जिल्ह्यातील तीन नगर पालिका व दोन नगर पंचायतींनी शहरी भागात स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शहरातील कुठेही कचऱ्याचे ढिग दिसता कामानये असे त्यांनी स्पष्ट सांगितले. औंढा नागनाथ तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत केल्या जाणारी विकास कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याकडे विशेष लक्ष द्यावे, औंढा नागनाथ मंदिराच्या परिसरात असलेला तलाव स्वच्छ करून त्यामध्ये गाळ साचणार नाही तसेच घाण पाणी जाणार नाही याची दक्षता नगर पंचायतीने घ्यावी असे त्यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील वाळू घाटावरून होणारी वाळू चोरी खपवून घेतली जाणार नाही. वाळू चोरीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाने समन्वय ठेऊन आवश्‍यक कारवाई करावी. अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात विकसीत महाराष्ट्र, विकसीत भारत योजने अंतर्गत वसमत व औंढा नागनाथ तालुक्यात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी अडवणूक करू नका टॉवर उभारणीसाठी तातडीने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास त्याचा नागरीकांनाच फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात हि आपली पहिलीच भेट असून पुढील दोन महिन्यात आपण पुन्हा एकदा भेट देणार असून त्यावेळी सर्व बाबींची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी आज दिलेल्या सुचनांवर तातडीने कार्यवाही करावी असे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *