Headlines

मेंढी चराई निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अमरावतीत मेंढपाळांचे आंदोलन:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या; 24 ऑगस्टच्या शासन निर्णयाची मागणी




मेंढी चराईच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील मेंढपाळांनी आज, गुरुवार, २७ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्याच्या वन विभागाने २४ ऑगस्ट रोजी यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला होता. या जीआरनुसार प्रत्येक जिल्हा पातळीवर आवश्यक कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे संबंधित पत्रव्यवहार त्वरित पूर्ण करून या निर्णयाची अंमलबजावणी सरसकट केली जावी, अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. मेंढपाळांचे नेते अर्जुन महानर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत २१ वनविभागांमध्ये उपलब्ध असलेल्या निश्चित वन क्षेत्रांवर मेंढी चराईसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, इतर २७ वनविभागांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार जागा उपलब्ध असल्यास मर्यादित स्वरूपात चराईची परवानगी देण्याच्या सूचना आहेत. याशिवाय, ई-क्लास गायरान, शेड्युल जमीन आणि इतर पडिक जमिनींवर मेंढी चराईसाठी मान्यता मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे म्हटले आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी तसे आदेश काढत नाहीत, तोपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी होणे अशक्य आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो मेंढपाळ कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रशासनाने याची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीही चराई क्षेत्राबाबत निर्णय व्हावा यासाठी मेंढपाळांनी याच ठिकाणी आंदोलन केले होते, त्यावेळी विविध लोकप्रतिनिधी आणि संघटनांच्या पुढाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रयत्नांमुळेच शासनाने हा निर्णय जारी केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *